मुंबई | Mumbai
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर या संपूर्ण घटनेभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी VSR कंपनी, नागरी उड्डाण संचलनालय (डीजीसीए) यांच्यावर गंभीर आरोप केले असून अजितदादांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय बोलून दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटात एक महत्त्वाची घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 आमदार काल रात्री देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना भेटायला गेले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २० पेक्षा जास्त आमदारांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री उशीरा, मुंबईतील देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवार यांची आमदारांनी भेट घेतली. या भेटीत आमदारांकडून डीजीसीएच्या अहवालाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याचे समजते. अजित पवारा यांच्या अपघातानंतर महिन्याभराने डीजीसीएचा अहवाल समोर आला. मात्र त्या अहवालातील त्रुटी दाखवत तसेच अजित दादांच्या अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करून देखील अद्याप का नेमण्यात आलेली नाही, याबाबत आमदारांकडून सवाल उपस्थित करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ
सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या विमान अपघाताची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडून चौकशी व्हावी, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. या मागणीचे काय झाले, याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा करावी, असे राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्यावर सुनेत्रा पवार यांनी आपण लवकरच सगळे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सांगितल्याचे समजते.
Rajya Sabha Elections: राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शरद पवारांना आव्हान देण्याच्या तयारीत?
शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहे. अपघात कसा झाला? त्यमागचे सूत्रधार कोण? यावर रोहित पवार बोलत आहेत. प्रझेंटेशन देऊन समजावत आहेत. तसेच अजितदादांचा घातपातच झालाय असेही वारंवार सांगून कारवाईची मागणी करत आहेत. याशिवाय या अपघाताची क्रिमिनल अँगलने चौकशी करण्यासाठी एफआयआर घेण्यासाठीही प्रयत्न करत आहेत. मात्र, एफआयआर नोंदवून घेतला जात नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदारांनी डीजीसीएने अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सादर केलेल्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचे सुनेत्रा पवार यांना सांगितले. या अहवालाबाबत अनेक प्रश्न आणि शंका या आमदारांनी कालच्या बैठकीत उपस्थित केल्या. सुनेत्रा पवार यांनी देवगिरीवर आलेल्या प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याचेही समजते.
मात्र, सुनेत्रा पवार यांनी कालच्या बैठकीवेळी देवगिरी बंगल्यावर आलेल्या आमदारांना अजित पवार यांच्या अपघातानंतर मिळालेल्या वस्तू सगळ्यांना दाखवल्या. यामध्ये अजित पवार यांची चप्पल आणि घड्याळाचा समावेश आहे. त्या अनुषंगानेही सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये चर्चा झाली.





