मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वेग घेतला आहे. त्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे २० ते २२ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या विधानानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे दोन दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आमदारांना फोन फोन येत असल्याची माहिती समोर आली होती. पक्षातील सध्याच्या घडामोडींबाबत त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न या फोनद्वारे करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.
असे असतानाच, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील जिजाऊ निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मंत्री दत्तात्रय भरणे, शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके आणि भोरचे आमदार शंकर मांडेकर उपस्थित आहेत. दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असताना या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आली आहे.
पार्थ पवार यांनी इतक्या तातडीने ही बैठक का बोलावली आणि या बैठकीला ठराविक आमदारांनाच का बोलावले, याविषयी राजकीय वर्तुळात निरनिराळे तर्क लढवले जात असतानाच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीनंतर आमदार शरद मांडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमदार शरद मांडेकर यांनी बैठकीत नेमकं काय घडलं, याविषयी माहिती दिली.
मंत्री संजय शिरसाटांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न; दोन जणांना अटक, २ जण जखमी
आमदार शरद मांडेकर म्हणाले, ‘आम्ही खरंतर दरवर्षी पाडव्याला अजितदादांना भेटायला जायचो. अजितदादांच्या निधनामुळे यंदा दिवाळी साजरी केली नाही. पवार कुटुंबीयांनी देखील दिवाळी साजरी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांना भेटता आले नाही. सुनेत्रा पवार वहिनी पुण्यात आल्याचे कळाले. त्यामुळे त्यांना भेटायला आलो. त्यात दुष्काळ जाहीर झाला. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुकांच्या यादीत मुळशीचं नाव आलं नाही. त्याचा पाठपुरावा सुनेत्रा पवार यांच्याकडे करायचा होता. वेगवेगळी विकासकामे आहेत. आचारसंहितेमुळे काही कामे रखडली होती. त्यामुळे वहिनीची भेट घेऊन लक्ष देण्याची विनंती केली’.
राष्टवादीच्या विलिनीकरणासंदर्भात मांडेकर म्हणाले, ‘विलिनीकरणावर काहीच चर्चा झाली नाही. आम्ही फक्त तीन आमदार होतो. तीन आमदार थोडीच विलिनीकरणावर चर्चा करतील. पार्थ पवार काहीच बोलले नाही. आमचं काम सुनेत्रा वहिनींकडे होते. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे सर्वच पक्षाचे लोक येतात. परंतु विलिनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. आम्हाला निधी मिळतोय. सुनेत्रा वहिनी पालकमंत्री आहेत. मी अजितदादांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. त्यांचं कुटुंब जो निर्णय घेईल, तो मान्य राहील. ती दादांची इच्छा होती. आता सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेईल, तो मान्य असेल. शेवटी गणित वरिष्ठ नेते ठरवतील. ते आम्हाला मान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.




