पुणे | Pune
पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्रित जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडीची चर्चा काल (शुक्रवारी, ता २६) फिस्कटली. कारण अजित पवारांनी शरद पवारा़ंच्या पक्षाला अवघ्या तीस ते पस्तीस जागा देऊ केल्यात आणि घड्याळ या चिन्हावर लढण्याची अट घातली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ऐनवेळी जागावाटप आणि घड्याळ चिन्हावरून मतभेद निर्माण झाल्याने बोलणी फिसकटल्याची माहिती मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार गटात गुप्त बैठकांच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. दोन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढण्यावर एकमत केले होते. मात्र ऐनवेळी ही बोलणी फिसकटल्याची चर्चा आहे. घड्याळ की तुतारी वाजवणारा माणूस, कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, याचवरून दोन्ही गटात बिनसले असल्याची चर्चा आहे. ही युती फिसकटल्यानंतर शरद पवार गटाने तातडीने काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांसोबत बोलणी करून महाविकास आघाडीची मोट बांधल्याची माहिती आहे.
यामुळे युती फिस्कटली
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही राष्ट्रवादीचे जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने काल रात्री चर्चा फिस्कटली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या साथीनेच लढण्याचा निर्णय घेत काँग्रेस आणि उद्धवसेनेशी चर्चा सुरू केली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांच्या आघाडीसाठी शरद पवार गटाचे नेते माजी महापौर अंकुश काकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती होस्टेलवर शुक्रवारी रात्री भेट घेतली. त्यावेळी जागावाटप आणि घड्याळ की तुतारी चिन्हावर लढायचे, याविषयी चर्चा झाली. शरद पवार गट तुतारी चिन्हासाठी ठाम होता. केवळ ३५ जागा देण्याचा प्रस्तावही शरद पवार गटाला अमान्य होता. त्यामुळे चर्चा फिस्कटली, अशी माहिती समोर आली आहे.
अजित पवार सकाळी कुठे गेले?
ही राजकीय उलथापालथ घडल्यानंतर अजित पवार अचानक आपला ताफा आणि पोलीस संरक्षण न घेता पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडल्याची माहिती आहे. आज सकाळी अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये आले होते. मात्र अवघ्या काही मिनिटांत ते पोलीस संरक्षण न घेता तिथून एकटेच निघून गेले. उपमुख्यमंत्री पदावरील एक राजकीय नेता पोलीस सरंक्षण न घेता अशा प्रकारे निघून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आता अखेर अजित पवारांचे लोकेशन सापडले आहे. बारामती हॉस्टेलमधून अजित पवार ज्या कारने बाहेर पडले होते, ती कार अजित पवारांच्या शिवाजी नगर येथील जिजाई निवासस्थानाबाहेर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अजित पवार देखील इथेच जिजाई निवासस्थानात असण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे अजित पवार पोलीस ताफा न घेता जिजाई निवासस्थानी का गेले? इथे ते कुणाला भेटायला आले? अजित पवारांच्या आधीच जिजाई निवासस्थानी कुणी आलेय का? अशा विविध चर्चांना उधाण आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




