कर्जत जामखेड | KarjatJamkhed
शुक्रवारी कर्जतप्रमाणेच जामखेडमध्ये आमसभेच्या माध्यमातून सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रोहित पवार यांनी प्रयत्न केल्याचे पहायला मिळाले. पण या आमसभेत मोठा राडा झाला. एका कार्यकर्त्याने मांडलेल्या प्रश्नला उत्तर देताना रोहित पवार अधिकाऱ्यावर भडकल्याचे पहायला मिळाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामानिमित्ताने आमदार रोहित पवार एका अधिकाऱ्यावर चांगलेच संतापले. “पैसा तुमच्या बापाचा नाही. माज दाखवू नको” असा संताप त्यांनी व्यक्त केला. मात्र आता रोहित पवारांच्या या कृतीवर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. रोहित पवार हे अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी रोहित पवारांच्या कृतीचे स्वागत केले आहे. काही अधिकारी वेळेत कामच करत नसल्याची तक्रार नागरिकांची होती.
नेमकं काय घडलं?
एका व्यक्तीने प्रश्न विचारल्यानंतर अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर रोहित पवार भडकले. मोघम उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्याची रोहित पवार यांनी कानउघडणी केली. आतापर्यंत गोट्या खेळत होता का? तक्रार करणारे नागरिक बावळट, वेडी आहेत काय? तू मिजासखोर बनू नकोस. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, लोकांचा पैसा आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी अधिकाऱ्याला झापले. पण त्यानंतर रोहित पवारांचा संताप अधिकच वाढला.
आधी खिशातून हात काढ
रोहित पवार यांना अधिकाऱ्याची वागणूक आवडली नाही. अधिकारी खिशात हात घालून उभा होता. त्यावेळी रोहित पवार यांनी आधी खिशातून हात काढ, असे म्हणत झापले. तू लय शहाणा लागून गेलाय. इथे लोकं आलीत म्हणजे काम खराब झालं आहे. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे. तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहेत. काम चांगल्याच क्वालिटीचे काम झाले पाहिजे, असे रोहित पवार यावेळी म्हणाले. पण रोहित पवारांच्या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, रोहित पवारांनी अनेक कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांनी रोहित पवारांच्या कामाचे कौतुक केले. अधिकाऱ्यांना अशीच भाषा कळतेची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. तर विरोधकांनी, लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची कामे करवून घेणे हे प्रत्येक आमदाराचे कर्तव्यच आहे. पण एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.





