मुंबई | Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनी शिर्डीत झालेल्या भाजपच्या अधिवेशनात शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Sharad Pawar and Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली होती. १९७८ पासून शरद पवारांचे दगाफटक्याचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेने २० फूट गाडले असे शाह म्हणाले होते. त्यावर आज शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पलटवार करत अमित शाहांना चांगलेच सुनावले आहे.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “देशाच्या गृहमंत्र्यांनी (Home Minister) परवा भाषण केले, त्यात काही विधाने केली. त्यांनी १९७८ सालचा उल्लेख केला. त्यांना माहिती नसेल पण १९७८ साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. जनसंघाच्या लोकांनीदेखील माझ्या बरोबर काम केले आहे. त्यांनी आम्हाला सहकार्य केले होते, अशी आठवण शरद पवार यांनी शाह यांना करून दिली. आधीच्या काळात देशात वेगवेगळे पक्ष सत्तेत होती. पण राजकीय पक्षातील नेत्यात सुसंवाद होता. उदाहरणच द्यायचं तर वाजपेयी आणि आडवाणी यांचं नाव घेतलं पाहिजे. हे कर्तृत्ववान लोक होते. त्यांच्यातील कोणीही तडीपार नव्हते, असे म्हणत पवारांनी शाहांना टोला लगावला.
पुढे ते म्हणाले की, भुजमधे भूकंप (Earthquake) झाला त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी एक बैठक बोलावली होती. मी विरोधी पक्षात असताना देखील अटलबिहारी वाजपेयी यांनी मला एका समितीवर नेमले होते.सगळी जबाबदारी माझ्याकडे दिली होती. ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्याकडे आहे. पण हल्लीच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर आणि उद्धव ठाकरेंवर जे भाष्य केले ते मला जिव्हारी लागलेले नाही, पण संबंधित व्यक्तीची नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, असा टोला शरद पवारांनी अमित शाह यांना लगावला. तसेच मराठीत एक म्हण आहे कुठे कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी अशी म्हण आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले.
त्यावेळी शाह सहकार्यासाठी बाळासाहेबांकडे आले होते
शरद पवार म्हणाले की, अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले. पण ज्यावेळी गुजरातमध्ये त्यांना राहायला अडचण निर्माण झाली होती, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे त्यांनी मदत मागितली होती. बाळासाहेबांनी त्यांना आश्रय दिला होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.