देशात करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी देखील करोना सावटाचे गांभिर्य लक्षात आणून दिले. देशात सध्या करोना आणि इन्फ्ल्युएन्झाची साथ सुरु आहे. केंद्रीय मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेली आकडेवारीही परिस्थितीचे गांभिर्य वाढवते. बुधवारी देशात करोना संसर्गाची 1134 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. हाच आकडा मंगळवारी 699 होता. सक्रीय रुग्णांची संख्या सात हजारांपेक्षाही जास्त होती. पंतप्रधानांनी पाच सुत्री पाळण्याचे आवाहन केले. टेस्टिंग, टॅकिंग, उपचार, लसीकरण आणि करोना अॅप्रोप्रिएट बिहेव्हियर हा तो पाच सुत्री कार्यक्रम आहे. श्वसनसंस्थेच्या संसर्गाशी संबंधित आजारांच्या चाचण्या वाढवाव्यात, जिनोम सिक्वेन्सिग सुरुच ठेवावे, करोनाशी लढण्यासाठी रुग्णालयांची सुसज्जता, श्वसन स्वच्छता आणि करोना टाळण्यासाठी निर्बंधांचे पालन करण्याचेही आवाहन त्यांनी केले. जे प्रशासकीय व सामाजिक पातळीवर करोनाचे गांभिर्य लक्षात आणून देणारे आणि प्रशासकीय हालचाली गतीमान करणारे ठरावे. करोना संसर्गाचे गांभिर्य लोकांना वेगळे लक्षात आणून देण्याची आवश्यकता नाही. याआधीच्या करोना लाटांचे तीव्र परिणाम कमी अधिक फरकाने सर्वांनीच सहन केले आहेत. करोना संसर्गाचा भयावह वेग लोकांनी अनुभवला आहे. आर्थिक, सामाजिक, शारीरिक व मानसिक आरोग्यावर करोना संसर्गाच्या परिणामांची तीव्रता आजही कायम आहे. तथापि लोकांचे सामाजिक वर्तन मात्र नेमके त्याच्याविरुद्ध आढळते. करोना समाजातून हद्दपार झाला असा लोकांचा भ्रम झाला असावा का? करोना संसर्गाला दूर ठेवण्यास सहाय्यभूत ठरलेल्या त्रिसुत्रीचा लोकांना साफ विसर पडला आहे. वारंवार हात धुणे, तोंडाला मुसके बांधणे आणि सामाजिक अंतर राखणे लोकांनी बासनात गुंडाळले आहे. अगदी रुग्णालयात सुद्धा हे निर्बंध पाळले जात नसल्याचे आढळते. करोना काळात जागरुकता निर्माण झाली होती. लोक थुंकत नव्हते. सार्वजनिक आणि कौटुंबिक सोहळे मर्यादित झाले होते. अनेकांच्या व्यसनांवर नाईलाजाने का होईना पण काहीशी मर्यादा आली होती. तथापि हे शहाणपण तात्पुरते ठरले असावे अशी शंका यावी असेच सध्याचे वातावरण आहे. सर्वधर्मीय सण उत्साहात साजरे केले जात आहेत. सणांच्या निमित्ताने लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येत आहेत. प्रशासकीय पातळीवरही काहीशी ढिलाई लोकांच्या अनुभवास येते. रुग्णालयांमधील प्राणवायुच्या सज्जतेविषयी माध्यमात वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध होते. ते चित्र आशादायक म्हणता येईल का? रुग्णालयांची अग्निशामक यंत्रणा तपासणी नेहमीच वादाच्या भोवर्यात सापडते. सरकारी करोना केंद्रांना टाळे लावले गेले आहे. त्यातील सामानाची आणि रुग्णउपचारास सहाय्यभूत ठरणार्या यंत्रांच्या सध्याच्या अवस्थेवर किती अधिकारी प्रकाश टाकू शकतील? करोना परतणार नाही असे प्रशासनाला देखील वाटत असावे का? लोकांना घाबरवून देण्याचा हा प्रयत्न नाही. लोकांनी जागरुक होण्याची गरज आहे. निर्बंधांच्या त्रिसुत्रीचे पालन, लसीकरणाचे सरकारने जाहीर केलेले सगळे डोस घेणे आणि प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम यावर भर द्यायला हवा. पंतप्रधानांनी प्रशासनाला जसे जागे केले तसेच लोकांनाही आवाहन केले आहे. करोना केव्हाही परतू शकतो याची जाणीव करुन दिली आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासन आणि लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.