नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाज नीरू धांडा हिने मंगळवारी ‘सुवर्ण वेध’ घेत महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. यंदाच्या स्पर्धेतील हे भारताचे पाचवे सुवर्णपदक, तर वैयक्तिक प्रकारातील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. नीरुने एकुण २८ शॉट्सचे गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.
स्पर्धेदरम्यान पावसामुळे परिस्थिती आव्हानात्मक होती. मात्र, नीरूने आपला संयम कायम ठेवत शानदार कामगिरी केली. सुरुवातीपासूनच तिने प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी मिळवली आणि अखेर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
यापूर्वी महिलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत तिने २६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. चीनच्या सन युनोंग आणि कुवेतच्या हजर अब्दुलमलिक यांनी प्रत्येकी २१ गुण मिळवत संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले, तर कतारच्या रे बासिल हिने १६ गुणांसह चौथे स्थान मिळवले.
नीरू धांडाने अंतिम फेरीची सुरुवात दमदार केली. पहिल्या सेटमध्ये तिने पाचही प्रयत्नात अचूक निशाणा साधला. दुसऱ्या सेटमध्ये तिचा एक निशाणा चुकला; मात्र तिने लगेच पुनरागमन करत आपली आघाडी कायम ठेवली. तिसऱ्या सेटमध्ये तिने पुन्हा एकही लक्ष्य चुकवले नाही आणि अव्वल स्थानावर झेप घेतली. चौथ्या सेटनंतर तिने २० पैकी १९ अचूक निशाणे साधले. २५ निशाण्यांनंतर नीरू २३-२१ अशी सन युनोंगच्या पुढे होती. हजर अब्दुलमलिकही २१ गुणांवर होती; मात्र त्यानंतर ती स्पर्धेतून बाहेर पडली. निर्णायक टप्प्यात नीरूने दबावाखालीही शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
राज ठाकरे अन् राहुल गांधींमध्ये गुफ्तगू? संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले…
नीरू धांडाच्या या कामगिरीमुळे भारतीय ट्रॅप शूटिंगच्या इतिहासात आणखी एक मोठी नोंद झाली आहे. यापूर्वी याच वर्षी इटलीमध्ये झालेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.
याआधी मंगळवारी नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी महिलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. भारतीय संघाने एकूण ३२८ गुण मिळवले. चीनने ३४६ गुणांसह सुवर्णपदक, तर कुवेतने ३२५ गुणांसह कांस्यपदक जिंकले. सांघिक स्पर्धेत नीरू भारताची सर्वोत्तम कामगिरी करणारी नेमबाज ठरली. तिने १२५ पैकी ११८ गुण मिळवले. नीरूच्या वैयक्तिक सुवर्णपदकामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची पदकसंख्या ४७ झाली असून त्यात ५ सुवर्ण, २१ रौप्य आणि २१ कांस्यपदकांचा समावेश आहे.




