Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनीट पेपर फुटी प्रकरणात मनीषा हवालदारला पुण्यातून अटक; तिन्ही मनीषांमध्ये असं होतं...

नीट पेपर फुटी प्रकरणात मनीषा हवालदारला पुण्यातून अटक; तिन्ही मनीषांमध्ये असं होतं कनेक्शन

पुणे | प्रतिनिधी
देशभरात खळबळ माजवून देणाऱ्या नीट २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई करत पुण्यातील एका नामांकित शाळेतील प्राध्यापिका मनीषा संजय हवालदार यांना भौतिकशास्त्राचा (फिजिक्स) पेपर लीक केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. या अटकेमुळे पेपरफुटीचे धागेदोरे पुण्यात खोलवर रुजल्याचे स्पष्ट झाले असून, आतापर्यंत या प्रकरणात एकूण ११ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत या प्रकरणात तीन महिलांना अटक करण्यात आली असून तिन्ही महिला आरोपींची नावे ‘मनीषा’ (मनीषा हवालदार, मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे) असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एनटीएकडून परिक्षा प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्ती
मनीषा हवालदार या सध्या पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशालेत कार्यरत होत्या. विशेष म्हणजे, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) त्यांची परीक्षा प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती, ज्यामुळे त्यांना भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत थेट पोहोच मिळवणे शक्य झाले होते. याच पदाचा गैरवापर करून त्यांनी प्रश्न लीक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरेंमध्ये कनेक्शन
मनीषा हवालदार यांनी यापूर्वी अटक झालेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यासोबत संगनमत करून भौतिकशास्त्राचे काही प्रश्न लीक केले होते. सीबीआयने केलेल्या पडताळणीत असे आढळले की, त्यांनी लीक केलेले प्रश्न आणि प्रत्यक्ष परीक्षेत विचारलेले प्रश्न हे तंतोतंत सारखेच होते.

Rohit Pawar: मेलोडीच्या चॉकलेटप्रमाणे…; रोहित पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, म्हणाले, सुरवातीला टाळ्या-थाळ्या…

या दोन्ही ‘मनीषा’ एकमेकींना चांगल्या ओळखत होत्या आणि गुपचूप भेटत असत. याच गुप्त भेटींमध्ये देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य विकण्याचा कट रचला गेला. तर मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांची ओळख पार्लरमध्ये झाली. याच ओळखीतून पुढे त्यांनी हा कट रचला. मनीषा वाघमारे विद्यार्थी आणि पालकांशी संपर्क साधून मनीषा मांढरेकडे पाठवत असे.

महिनाभरात सेवानिवृत्त होणार होती
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा हवालदार येत्या जून महिन्यात सेवानिवृत्त होणार होती. याचप्रमाणे मांढरे हिचेही सेवेचे शेवटचे काही महिने उरले होते. ‘या दोन्ही मनीषा एकमेकांना ओळखत होत्या; तसेच त्यांच्या भेटीदेखील होत असत,’ अशी माहिती एका मराठी वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

प्रश्नपत्रिका लीक होण्याचा मूळ स्रोताचा शोध सुरु
या प्रकरणाचा सखोल तपास करताना सीबीआयने देशभरातील विविध ठिकाणी छापेमारी केली असून लॅपटॉप, मोबाईल फोन, बँक स्टेटमेंट्स आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या साहित्याच्या विश्लेषणातून प्रश्नपत्रिका लीक होण्याचा मूळ स्रोत शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना विशेष कोचिंग क्लासेसमध्ये प्रश्न पुरवणाऱ्या दलालांचे मोठे रॅकेट यामागे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम झाला असून त्यांना आता २१ जून रोजी पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत मनीषा हवालदार यांच्यासह लातूरचे केमिस्ट्रीचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे, शिवराज मोटेगावकर, शुभम खैरनार आणि धनंजय लोखंडे अशा अनेकांना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून आत्ता पर्यंत कोणाकोणाला अटक
मनीषा हवालदार – CBI

शिवराज मोटेगावकर – CBI कोठडी

प्रल्हाद कुलकर्णी – CBI कोठडी

मनीषा मांढरे – CBI कोठडी

मनीषा वाघमारे – CBI कोठडी

शुभम खैरनार – CBI कोठडी

धनंजय लोखंडे – न्यायालयीन कोठडी

दुसऱ्या राज्यातून झालेली अटक :

दिनेश बिवाल – न्यायालयीन कोठडी

मांगीलाल बिवाल – न्यायालयीन कोठडी

विकास बिवाल – न्यायालयीन कोठडी

यश यादव – न्यायालयीन कोठडी

आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

पंचवटी

Nashik News: गोदावरीला पुराचा वेढा! पंचवटी व भांडी बाजारात पाणी शिरल्याने...

0
नाशिक | प्रतिनिधीजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुख्य गंगापूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर...