दिल्ली | Delhi
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 स्पर्धेत क्रिकेट या खेळात नेपाळ क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. खेळाच्या पहिल्याच सामन्यात नेपाळ विरुद्ध मंगोलिया संघ आमने-सामने होते. या सामन्यात नेपाळचा 273 धावांनी विजय झाला. या विजयासह नेपाळने टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वच विक्रम मोडीत काढले. नेपाळ टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 314 धावसंख्या उभारणारा संघ बनला. तसेच, संघाच्या दोन फलंदाजांनी वेगवान शतक आणि अर्धशतकांचा विक्रमही मोडीत काढला. नेपाळच्या संघाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडले आहेत. नेपाळने या सामन्यात टी-20 मधील 5 वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. ते कोणते हे पाहूयात…
नेपाळच्या संघाने मंगोलियाविरुद्धच्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये तब्बल 314 धावा कुटल्या. विशेष म्हणजेच केवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात त्यांनी एवढी मोठी धावसंख्या उभारली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये एकाच डावात कोणत्याही संघाने 300 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 300 धावा करणारा नेपाळ हा पहिला देश ठरला आहे. नेपाळचा फलंदाज कुशल मल्लाने टी-20 च्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. 34 चेंडूंमध्ये कुशलने शतक झळकावलं आहे. कुशल मल्ला 50 चेंडूंमध्ये 137 धाव करुन नाबाद राहिला. त्याने 8 चौकार आणि 12 षटकार लगावले. म्हणजेच त्याने 104 धावा केवळ 20 चेंडूंमध्ये केल्या.
याशिवाय दीपेंद्र सिंह ऐरी नावाच्या नेपाळच्या फलंदाजाने टी-20 मधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं असून केवळ 9 चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं आहे. दीपेंद्रने आपल्या पहिल्या 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले. दींपेंद्र हा 10 चेंडूंमध्ये 52 धावा करुन नाबाद राहिला. त्याने एकूण 8 षटकार लगावले. षटकारामधूनच त्याने 48 धावा केल्या. उर्वरित 4 धावा त्याने 2 चेंडूंमध्ये केल्या. दीपेंद्रने सिंहने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा टी-20 मधील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. दीपेंद्र सिंहने 10 चेंडूंमध्ये नाबाद 52 धावा केल्या म्हणजेच त्याने तब्बल 520 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. युवराजने 2007 साली झालेल्या टी-20 च्या पहिल्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना केवळ 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. याच सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडला 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले होते.
नेपाळ विरूद्ध मंगोलिया सामन्यात बनवले गेले हे मोठे रेकॉर्ड…
सर्वात जलद शतक – कुशल मल्लाने ३४ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं आहे.
सर्वात जलद अर्धशतक- दिपेंद्र सिंग ऐरीने ९ चेंडुंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे.
सर्वात मोठी धावसंख्या – २० षटकअखेर ३१४ धावा
सर्वाधिक षटकार – २४ षटकार
सर्वात मोठा विजय- २७३ धावा