Friday, November 22, 2024
Homeक्राईमनव्या फौजदारी कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल

नव्या फौजदारी कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

देशभरात सोमवारपासून (1 जुलै) नवे फौजदारी कायदे लागू झाले आहेत. या कायद्याअंतर्गत नगर जिल्ह्यातील पहिला गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी दाखल झाला. तालुक्यातील कामरगाव शिवारात सोमवारी पहाटे दोघा मित्रांना मारहाण करून कोयता व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तीन लाख 28 हजार रूपयांचा ऐवज लुटला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 309 (4), 3 (5), आर्म अ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गणेश मोहन शिंदे (वय 36 रा. कदमवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली असून तीन अज्ञात चोरट्यांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशभरात सोमवारपासून नवे फौजदारी कायदे लागू झाले आहे. ब्रिटीश काळात बनवलेल्या फौजदारी कायद्यांच्या जागी नवीन कायदे अस्तित्वात आले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा देशभरात लागू झाला आहे. दरम्यान, या कायद्यानुसार नगर जिल्ह्यातील पहिला गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. गणेश शिंदे व त्यांचा मित्र सोमवारी पहाटे नगर- पुणे रस्त्याने प्रवास करत असताना त्यांना कामरगाव शिवारात पहाटे साडेतीनच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडवले. त्यांना मारहाण केली.

या मारहाणीत गणेश जखमी झाले. चोरट्यांनी कोयता व चाकूचा धाक दाखवून गणेश व त्यांच्या मित्राकडील प्रत्येकी 15 ग्रॅम प्रमाणे तीन सोन्याच्या अंगठ्या, तीन तोळ्याची सोन्याची चेन, एक तोळ्याची सोन्याची चेन, दोन सोन्याच्या अंगठ्या, आठ हजाराची रोकड, एक मोबाईल असा तीन लाख 28 हजाराचा ऐवज लुटला. यांची माहिती गणेश यांनी नगर तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरू केला आहे. दरम्यान सदरचा रस्ता लुटीचा प्रकार जबरी चोरी असून तो गुन्हा जुन्या कायद्यानुसार भादवि कलम 392 नुसार दाखल केला जात होता. आता यात नवीन कायद्यानुसार बदल करण्यात आला असून तो गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 309 (4) नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.

2653 पोलिसांना प्रशिक्षण
नवीन फौजदारी कायद्याची जनजागृती करण्यासाठी पोलिसांकडून सोमवारी सकाळी नगर शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत शालेय विद्यार्थ्यांसह रॅली काढण्यात आली. नागरिकांना माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. बैठका, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती कार्यक्रमात पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यासह वकील सहभागी झाले होते. नगर जिल्हा पोलीस दलातील 150 पोलीस अधिकारी व दोन हजार 503 पोलीस अंमलदार यांना नवीन कायद्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या