सातपूर | प्रतिनिधी Satpur
सातपूर येथील ईएसआय रुग्णालयात कामगारांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक सर्व सुविधा आणि यंत्रसामग्री लवकरच पुरवली जाणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आमदार डॉ. सीमा हिरे यांना दिली. या अनुषंगाने आज विधीमंडळात विशेष बैठक घेण्यात आली.
बैठकीत आ. हिरेंनी ईएसआय रुग्णालयातील जुनी आणि जीर्ण इमारत, डॉक्टर व कर्मचार्यांची अपुरी संख्या, आयसीयू कक्षाची गरज, प्रसूती कक्षाची आवश्यकता आणि अद्ययावत उपकरणांचा अभाव यावर सविस्तर माहिती दिली. तसेच, वाढती पॉलिसीधारक कामगारांची संख्या लक्षात घेता रुग्णालयाची क्षमता अडीचशे बेडपर्यंत वाढवणे आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी अडीचशे बेडच्या नव्या इमारतीसाठीचा प्रस्ताव मार्गी लावण्याची ग्वाही दिली असून, सर्व आधुनिक वैद्यकीय साधन-सामुग्री व सुविधांसह रुग्णालयाला सक्षम बनवले जाईल, असे आश्वासन दिले.
तसेच, १५ ऑगस्ट रोजी आयसीयू कक्षाचे उद्घाटन करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.या निर्णयांमुळे सातपूर परिसरातील हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवेत मोठा दिलासा मिळणार आहे.




