पाचेगाव फाटा |वार्ताहर| Pachegav Phata
मोटारसायकल घसरुन रस्त्यावर पडली. या मोटारसायकवरुन कार गेल्याने मोटरसायकलवरील दोघे चिरडून मृत्यूमुखी (Death) पडले तर दूरवर फेकला गेलेला एकजण जखमी (Injured) झाल्याची घटना नेवासा (Newasa) तालुक्यातील पुनतगाव फाट्याजवळ घडली. मृत पावलेले दोघेही पुनतगाव येथील रहिवासी होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार 5 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ईसम नामे विक्रम भीमा आढाव (रा. शिरजगाव ता. येवला जि. नाशिक) हे आपल्या दोन मित्रांसमवेत मित्राच्या मारुती रिट्स कारने भालगाव तालुका नेवासा येथे स्वतःकरिता सेकंडहॅण्ड कार पाहण्यासाठी श्रीरामपूरकडून नेवाशाकडे येत होते. पुनतगाव फाट्याच्या जवळ नेवाशाकडून एका मोटारसायकलवर तिघेजण येत असताना मोटारसायकल घसरून पडल्याने ती कारखाली आली.
मोटारसायकल कार खाली आल्याने दोघेजण कारखाली चिरडले गेले व पाठीमागे बसलेला तिसरा इसम बाजूला फेकला गेला. कार चालकाने कार थांबवून पाहिले असता दोघेजण गंभीर जखमी झालेले होते. कार चालक विक्रम भीमा आढाव हा आपल्या दोन्ही मित्रांसह रस्त्याने जाणार्या दुसर्या वाहनाला थांबवून पोलीस ठाण्यात (Police Station) आला व पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा डायल 112 वर कर्तव्यावत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन पवार यांना घटनास्थळी पाठवले तसेच मृतक व जखमी यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय नेवासा येथे भरती केले. परंतु मोटारसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत झालेल्यांची नावे अमोल उर्फ शिवाजी भाऊसाहेब दारकुंडे (वय 32) तर दुसरे निवृत्ती ज्ञानेश्वर पवार (वय 56) दोघेही रा. पुनतगाव ता. नेवासा अशी आहेत. मोटारसायकलवर बसलेली तिसरी व्यक्ती सुभाष भाऊराव सोनवणे (रा. पुनतगाव) हे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी फौज फाट्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेच्या अनुषंगाने पोलीस ठाणे नेवासा येथे अकस्मात मयत दाखल झाला असून मोटारसायकलवरील दोन्ही मृतकांचा पंचनामा व पोस्टमार्टम कारवाई नेवासा पोलीस ठाण्याकडील (Newasa Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांनी पार पाडली.
घटनेचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली अमोल पवार करीत आहेत. मृत्यू झालेल्या दोघांवर सायंकाळी पुनतगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. निवृत्ती ज्ञानेश्वर पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, तीन भाऊ व वडील असा परिवार आहे तर अमोल उर्फ शिवाजी भाऊसाहेब दारकुंडे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगी व दोन मुले आहे. या अपघातामुळे पुनतगाव परिसरात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.





