नेवासा |शहर, तालुका प्रतिनिधी| Newasa
नगरपंचायत चौकातील मुख्य बाजारपेठेत दुकानांना बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत आठ ते दहा दुकाने जळून खाक झाली तर शेजारील दुकानांनाही आगीचा मोठा फटका बसला आहे. या आगीत दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील नगरपंचायत चौकातील व्यापारी व नागरिकांनी प्रसंगावधान राखत शेजारी दुकाने रिकामे केल्याने अनेक दुकानाचे नुकसान टळले.
दुकानांना आगीने वेढल्याने परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. दुकानांना आग लागल्याचे कळताच व्यापारी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांनी ही मोठी गर्दी केली होती. दुकानांना लागलेल्या आगीनंतर उशिरा नगरपंचायत अग्निशमन बंब आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रयत्न अपुरे ठरले पावणे अकरा वाजता भेंड़ा कारखाना येथील अग्निशमन बंब आल्यानंतर आग आटोक्यात आली. यावेळी शेकडो तरुणानी मदत केली.
यावेळी दुकानातून होणाऱ्या स्फोटामुळे नागरिक भयभीत होऊन दूर पळत होते. सदरिल ठिकाणी गॅस टाकी किंवा फ्रिज असल्याने हे स्पोट होत होते. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, मुळा एज्युकेशन सोसायटीचे उदयन गडाख, राष्ट्रवादीचे अब्दुल शेख, आम आदमी पक्षाचे ॲड. सादिक शिलेदार यांनी घटनास्थळी भेट दिली.
आगीचे कारण समजू शकले नाही परंतु या घटनेने पुन्हा एकदा पक्की दुकाने हवी हा प्रश्न ऐरणीवर आला आहे




