Friday, November 22, 2024
Homeनगरडॉ. विखेंच्या गुगलीने नेवासा मतदारसंघात राजकीय चर्चेचे ढग!

डॉ. विखेंच्या गुगलीने नेवासा मतदारसंघात राजकीय चर्चेचे ढग!

नेवासा | Newasa

राजकीय मिश्किली करत माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी नेवासा मतदारसंघात विधानसभा लढण्यावर भाष्य केले. ते लढणार अथवा नाही, हा भाग नंतरचा. पण त्याआधी ते लढलेच तर काय होईल, याचे राजकीय चित्र मतदारसंघात रंगविले जात आहे. दरम्यान, डॉ.विखेंच्या गुगलीने तालुक्यातील अनेकांची चिंता निश्चितच वाढली आहे. भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे दोन्हीही नेते भाजपाकडून नेवासा विधानसभेसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे पक्षाचा निर्णय दोघांनीही मान्य केला पाहिजे.

- Advertisement -

तुमच्या दोघात जर समन्वय झाला नाही तर मी आता मोकळाच आहे, अशी मिश्किल टीपणी डॉ.सुजय विखे पाटील यांनी नेवासा येथे केली. यावरून ते मतदारसंघात लढण्यासाठी इच्छुक आहेत, असा काढला गेला. त्याची चर्चा अद्याप सुरू आहे. डॉ.विखे यांनी त्यानंतर राहुरी आणि संगमनेरबाबत स्पष्ट भुमिका मांडल्यानंतरही नेवासाबाबतची कुजबुज तालुक्यात बंद झालेली नाही. 31 ऑगस्ट रोजी नेवासा येथे झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या खासगी कार्यक्रमात डॉ. सुजय विखे यांनी नेवासा मतदार संघाबाबत भाष्य केले होते. भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे विधानसभेसाठी पक्षाकडून इच्छूक आहेत. त्यामुळे पक्षाचा निर्णय दोघांनीही मान्य केला पाहिजे. तुमच्या दोघात जर समन्वय झाला नाही, तर मी आता मोकळाच आहे, असे ते म्हणाले.

डॉ. विखेंच्या नेवासातील या टिप्पणीमुळे नेवासा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी आ.शंकरराव गडाख आणि भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचे मात्र टेन्शन वाढणार आहे. डॉ.विखे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभव मागे टाकून सध्या जिल्हाभर ‘कार्यक्रम’ सुरू केला आहे. नेवासा तालुक्यातही काही राजकीय कार्यक्रम करण्याचा त्यांचा मनसुबा आहे का, असा प्रश्न यामुळे चर्चेत आला आहे.

गडाख-विखे लढत ?
माजी खासदार यशवंतराव गडाख आणि माजी खासदार दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्यात 1991 मध्ये झालेली दक्षिण नगर लोकसभा मतदार संघातील लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर झालेली न्यायालयीन लढाई यामुळे गडाख-विखे लढत मतदारांच्या चांगलीच लक्षात आहे. समजा दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू डॉ. सुजय विखे यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलीच तर चित्र कसे असेल, याची चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र आ.शंकरराव गडाख व दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू डॉ. सुजय विखे यांच्यात विधानसभेची लढत रंगली तर काय होईल, यावर गप्पांचे फड रंगले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या