Friday, January 30, 2026
HomeनगरNewasa : नेवासा नगरपंचायतीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांमधील वाद चव्हाट्यावर

Newasa : नेवासा नगरपंचायतीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांमधील वाद चव्हाट्यावर

बैठक असतानाही दालनाची स्वच्छता नाही

उपनगराध्यक्षांचे नगरपंचायत आवारातून कामकाज सुरु

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

नेवासा नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक यांनी संबंधित स्वच्छता व पाणीपुरवठा अधिकारी कर्मचार्‍यांची बैठक 27 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष यांच्या दालनात आयोजित केली होती. मात्र बैठकीस उपनगराध्यक्ष शालिनीताई सुखदान व नगरसेवक आले असता दालन व नगरपंचायत इमारतीची स्वच्छता करण्यात आलेली नव्हती. याचा निषेध म्हणून उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी नगरपंचायत कार्यालयाखाली मंडप टाकून तेथे उपनगराध्यक्षांचे दालन सुरु केले.

YouTube video player

याबाबत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नगर पंचायतीच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी उपनगराध्यक्ष व नगरसेवक नगरपंचायत येथे आले. त्यावेळी उपनगराध्यक्ष यांचे दालनाची स्वच्छता करण्यात आलेली नव्हती. तसेच संबंधीत अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते परंतु अध्यक्ष यांच्या दालनाची पूर्णपणे स्वच्छता करण्यात आलेली होती. त्यामुळे आम्हास असे निर्दशनास आले की प्रशासनाकडुन जाणीवपूर्वक भेदभाव केला जात आहे. किंवा प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहे.

अनुपस्थित कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नाही व उपनगराध्यक्ष यांचे दालन व नगरपंचायत इमारतीची पूर्णपणे स्वच्छता होत नाही तोपर्यंत उपनगराध्यक्ष यांचा कारभार नगरपंचायत आवारातून केला जाईल. आवश्यक त्या सोई-सुविधा पुरविण्याची जबाबदारी आपणावर राहील. निवेदनावर उपनगराध्यक्ष शालिनीताई सुखदान, गटनेता जितेंद्र कुर्‍हे, जयश्री शिंदे, संभाजी धोत्रे, स्वप्नील मापारी, शहीदाबी पठाण, सोनल चव्हाण, नसरीन शेख, शोभाताई व्यवहारे, प्रतिभा गवळी, स्वीकृत नगरसेवक राजेंद्र काळे यांच्या सह्या आहेत.

गोंधळ घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

नगराध्यक्षांची फिर्याद || उपनगराध्यक्ष, नगरसेवकांसह 17 जणांवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा नगरपंचायतीत सत्ताधारी व विरोधकांमधील संघर्ष चिघळला असून नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उपनगराध्यक्ष व काही विरोधी नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांवर बेकायदेशीर जमाव जमवून दालन बळकावणे, शासकीय कामकाजात अडथळा आणणे व दांडगाई केल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फिर्यादीत म्हटले की, सोमवारी सकाळी 11 वाजता नगराध्यक्ष डॉ. घुले आपल्या दालनात नागरिकांच्या गाठीभेटी घेत असताना उपनगराध्यक्ष शालिनी संजय सुखदान, संजय लक्ष्मण सुखदान, जालिंदर गवळी, राजू काळे, आसिफ पठाण, जयश्री शिंदे, दिनेश व्यवहारे, सोनल चव्हाण, जितेंद्र कुर्‍हे, अनिल शिंदे, स्वप्नील मापारी, धनु काळे, अनिकेत मापारी, संभाजी धोत्रे, जयदीप जामदार उमेश इंगळे अजय त्रिभुवन यांच्यासह आठ ते दहा जणांनी बळजबरीने दालनाचा ताबा घेतला. मला माझ्या सहकार्‍यांना असंसदीय भाषा वापरुन दमदाटी करून बाहेर काढण्यात आले.

खुर्ची व कागदपत्रे फेकून देण्यात आली उपनगराध्यक्ष शालिनी संजय सुखदान यांनी माझ्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेली नगराध्यक्ष पदनाम असलेली पाटी हाताने ओढून काढून टाकली. कार्यालयातील वस्तूंची तोडफोड करुन शासकीय मालमत्तेचे नुकसान केले.हा जमाव बेकायदेशीररित्या मुद्दामहून मला त्रास देण्याच्या हेतूने व कर्मचार्‍यांवर दबाव निर्माण करण्यासाठी कार्यालयात घुसला. दहशत निर्माण करण्यासाठी हे लोक आले. यातील काहींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर घटनेचे फेसबुक लाईव्ह करुन सोशल मीडियावर प्रसारीत केले. माझी व नगराध्यक्ष पदाची बदनामी, अपमान व अवहेलना होईल असे बेकायदा कृत्य केले.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात 17 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 132, 221, 329, 189(2), 190, 191(2),351(2), 352, 324 (3), 61(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : एलसीबीच्या छाप्यात अडीच लाखांचा गांजा जप्त

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत खर्डा पोलीस ठाणे हद्दीतील तरडगाव फाटा येथे विक्रीसाठी नेला जात असलेला सुमारे नऊ किलो गांजा जप्त केला...