Friday, May 3, 2024
Homeनगरनेवासा-श्रीरामपूर रस्त्याने प्रवास करा व मणक्याच्या त्रासापासून मुक्त व्हा..

नेवासा-श्रीरामपूर रस्त्याने प्रवास करा व मणक्याच्या त्रासापासून मुक्त व्हा..

नेवासा बुद्रुक |वार्ताहर| Newasa

विविध पक्ष संघटनांनी गेल्या काही वर्षात अनेकदा आंदोलने केली मात्र तरीही नेवासा ते श्रीरामपूर रस्त्यातील खड्ड्यांचा प्रश्न सुटत नसल्याने आता हा विषय नेवासा शहरातील सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला असून या रस्त्याने प्रवास करा आणि मणक्याच्या त्रासापासून मुक्त व्हा.. अशा पोस्ट प्रसारित करत सार्वजनिक बांधकाम विभागावर रोष व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

गेल्या दोन तीन दिवसांपासून नेवासा शहरातील सोशल मीडियावर नेवासा श्रीरामपूर रस्त्याबाबत अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत यात ‘नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर ने प्रवास करा आणि मणक्याच्या त्रासापासून मुक्त व्हा..’; ‘नेवासा ते श्रीरामपूर हेलिकॉप्टर सेवा होणार सुरू’; ‘अर्ध्या तासात श्रीरामपूरला पोहचा व बक्षीस मिळवा’ अशा स्वरूपाच्या पोस्ट करून सार्वजनिक बांधकाम विभागाची आता अब्रू वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे यावर तरुणांनी विविध प्रकारची टीका टिप्पणी करत रोष व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.

श्रीक्षेत्र शिर्डी, देवगड, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, म्हाळसा खंडोबा मंदिर, खुले झाल्याने या रस्त्यावर भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र या रस्त्याला भरपूर अंतरावर खड्डे पडलेले आहे त्यामुळे वाहन चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच नेवासा श्रीरामपूर हे अंतर पार करण्यासाठी दोन तासांचा वेळ लागत आहे. खरंतर हा रस्ता अवघ्या पाऊण तासाचा आहे. अनेक अपघातात काही महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे

रस्त्याची चाळणी झाली असून सदरील रोडवर अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याने संतप्त परिसरातील नागरिक, व्यापारी वर्ग व शालेय विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने लवकरचं रास्तारोको करण्यात येणार असल्याचा देखील इशारा देण्यात आला आहे

नेवासा श्रीरामपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दळणवळण आहे नेवासा बुद्रुक बहिरवाडी, भालगाव, सुरेगाव, पुनतगाव, पाचेगाव, बेलपिंपळगाव, साईनाथनगर, एस कॉर्नर, या पट्ट्यातून डबलट्रॉलीची ट्रॅक्टरमध्ये उसाची सर्रास वाहतूक केली जाते व या सर्व गावांतील ऊसवाहतूक सध्या याच रस्त्याने केली जात असल्याने मोठमोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे

ट्रॉलीला मागील बाजूस कुठल्याही प्रकारचे रेडियमपट्टी किंवा साईड लाईट लावलेले नसतात. त्याकडे परिवहन खात्याचे अधिकारी सोईस्करपणे दुर्लक्ष करताना दिसत असून यापूर्वीही रस्त्यावर लहान मोठ्या अपघातात हाकनाक बळी गेले आहेत.

डबलट्रॉली ट्रॅक्टर चालकांत बहुतेक जणांकडे वाहन परवाना, कागदपत्रेही नसतात. वाहनांना रिफ्लेक्टरही नसते.अशी वाहने बंद पडली किंवा टायर पंक्चर झाले तर रस्त्यावर आहे तिथेच दोनदोन दिवस सोडून चालक निघून जातात रात्रीच्यावेळी अशा वाहनांना धडकून अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे.

परिवहन अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

वाहन परवाना नियमावली सांगते, ट्रॅक्टरचालकाने वाहतुकीसाठी फक्त एकाच ट्रॉलीचा वापर करावा,वाहनांच्या पाठीमागील बाजूस परावर्तक पट्ट्या बसवाव्यात,ताशी दहा किमी वेगानेच वाहन चालवावे, क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करू नये, ट्रेलरसहित ट्रॅक्टरची लांबी 18 मिटरपेक्षा अधिक असू नये,मात्र परिवहन अधिकारी यांनी हे नियम धाब्यावर बसवले की काय? असा प्रश्न पडत आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या