Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात उद्यापासून रात्रीची जमावबंदी

राज्यात उद्यापासून रात्रीची जमावबंदी

मुंबई । प्रतिनिधी

राज्यात करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळून वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात रविवार रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश जारी करण्याचे निर्देश त्यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाला दिले.

- Advertisement -

मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस, औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्स चे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत दिले.

जनतेने कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे. तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या आदर्श कार्यप्रणालीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी., मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर माजी मंत्री डॉ दीपक सावंत,मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जर्‍हाड,मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता,महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीस उपस्थित होते.

.

- Advertisment -

ताज्या बातम्या