मालवण | Malvan
मालवण नगरपरिषद निवडणुकीच्यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्यात संघर्ष रंगला आहे. या संघर्षाने शनिवारी आणखी पुढची पायरी गाठली. कारण, मालवण पोलिसांकडून निलेश राणे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याच्या घरी बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता निलेश राणे यांनी आपले मत व्यक्त केले असून भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांविरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत.
माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, हे अपेक्षित होते. ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस देखील देण्यात आलेली नाही. मात्र, माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आम्ही गुन्हा पकडून दिला, हा आमचा गुन्हा झाला. ज्याने कॅमेरा पकडला होता त्यालादेखील आरोपी करण्यात आले आहे. हे सर्व दबावाखाली सुरु आहे, हे स्पष्ट दिसतेय. तुमची लोकं काही केलं तरी त्यांना मोकाट सोडले जाते, सगळे अधिकार आहेत. चोरी करा, डाका टाका, पैसे उधळा, त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीत. अजून माझ्यावर दहा केसेस झाले तरी मी पुढचे तीन दिवस यांना सोडणार नाही. आता पोलीस मला अटक कधी करणार, असा सवाल निलेश राणे यांनी विचारला.
तसेच, गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही. रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे चालू आहे. ते किती वेळाने कोणा कोणाच्या नंबरवर फोन करत आहेत, त्यांचा पीए किती लोकांच्या संपर्कात आहे, हे सर्व मला माहिती आहे, असे म्हणत निलेश राणेंनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांवरही निशाणा साधला. ज्यामुळे आता या टीकेला चव्हाण काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
भाजपा पदाधिकारी विजय केनवडेकर यांनी आमदार निलेश राणेंविरोधात मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवण पोलीस स्थानकात 189(1) म्हणजे बेकायदेशीर जमाव,189(2) म्हणजे सार्वजनिक शांतता भंग करणे, 329(4) म्हणजे चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करणे आणि 356(2) म्हणजे मानहानी करणे, यासाठी एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.




