Sunday, September 29, 2024
Homeनगरनिळवंडेतून विसर्ग: नदीकाठी सतर्कतेचे आदेश

निळवंडेतून विसर्ग: नदीकाठी सतर्कतेचे आदेश

मुळातील साठा आज 82 टक्क्यांवर जाणार || डिंभे, वडज, येडगाव ओव्हरफ्लो || दारणा, गंगापूर धरणांतून विसर्ग वाढविला

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटात गत दोन दिवसांपासून धुव्वाधार पाऊस सुरू असल्याने भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघरमध्ये तब्बल 19 तर रतनवाडी आणि पांजरेत 18 इंच पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाण्याचे लोंढेच्या लोंढे येत होते. प्रचंड पाण्याची आवक झाल्याने भंडारदरा आणि निळवंडेतून पाणी सोडण्यात आले. काल सायंकाळी निळवंडेतून 30775 क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीला पूर आला आहे.

- Advertisement -

गत दोन दिवसांपासून पाणलोटात जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. धबधब्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे भंडारदरात प्रचंड पाण्याची आवक होत आहे. या भागात अतिवृष्टी सुरू असल्याने जनजीवन गारठून गेले आहे. जनावरांचे हाल सुरू आहेत. शेती, रस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. भातपिके पाण्याखाली आहेत. गत बारा तासांत भंडारदरात तब्बल 1273 दलघफू पाण्याची आवक झाली. काल सकाळी धरणातून 27114 क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

त्यापैकी 1060 दलघफू पाणी निळवंडे सोडण्यात आल्याने निळवंडेही तुडंब झाले. परिणामी या धरणातूनही सकाळी प्रवरा नदीत 7320 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. भंडारारदात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सायंकाळी भंडारदरातून 25394 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते तर निळवंडेतून 30775 क्युसेकने पाणी सोडणे सुरू करण्यात आले. रात्री 7 वाजता हा विसर्ग 26885 क्युसेकपर्यंत घटविण्यात आला. प्रवरा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या पूराचे पाणी आज कोल्हार, बेलापूरात येण्याची शक्यता आहे.

मुळातील साठा आज 82 टक्क्यांवर जाणार

कोतूळ |वार्ताहर| Kotul

आषाढ महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रात हरिश्चंद्रगड, आंबित, कुमशेत, पाचनई, कोथळा, खडकी, वाघ दरी, घोटी,पैठण, कोतूळ या भागात पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे मुळा नदीला काल रविवारी विक्रमी पूर आला. पुरामुळे मुळा नदीवरील भागांतील छोटे मोठे पूल पाण्याखाली गेल्याने काही काळ मुळा परिसरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. या वर्षातील मुळा नदीची ही विक्रमी आवक आणि नदीचे रौद्ररूप पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

साठा सकाळी 18 हजार 502 दशलक्ष घनफूट होता. सकाळी 9 वाजता तो 18 हजार 683 दशलक्ष घनफूट झाला. दुपारी 12 वाजता 18,776 दलघफू झाला. दुपारी 3 वाजता 19,149 घनफूट झाला. तर सायंकाळी 6 वाजता 19 हजार 435 घनफूट झाला होता. रात्री 9.30 वाजता 19763 दलघफू पाणीसाठा झाला होता. धरणाकडे कोतूळ येथून जोरदार आवक सुरू आहे. आषाढ महिन्याच्या सांगतेला मुळा पाणलोटमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याने दोन दिवसांपासून मुळा नदीतून धरणाकडे विक्रमी आवक सुरू आहे. काल यावर्षीची विक्रमी आवक झाली. 41 हजार 600 क्युसेस इतका विक्रमी पूर मुळा नदीला पाहायला मिळाला. या पुरामुळे कोतुळ येथे मुळा नदी काठी असणारे कोतुळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरल्याने मंदिराततील भगवान शंकराची पिंड आणि नंदी पूर्णपणे पाण्याखाली गेले. मंदीराचे सभामंडपात व परिसरात चार ते पाच फुटा पेक्षा अधिक पुराचे पाणी पसरले होते. मंदिर परिसर पुराचे पाण्याने जलमय झाला होता.

मुळा नदीच्या पुरामुळे लहित ते लिंगदेव मार्गावरील पूल पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक बराच काळ बंद झाली होती. संगमनेर तालुक्यातील साकुर मांडवे पुलावर ही पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मुळा नदीतून काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 या 12 तासांत मुळा धरणात 933 घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. मुळा धरण सायंकाळी 75 टक्के भरले आहे. आज या धरणातील पाणीसाठा 82 टक्क्यांच्या पुढे जाणार आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास हेही धरण लवकरच ओव्हरफ्लो होऊ शकते. जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता व्ही. डी. पाटील, शाखाअभियंता आर. जे. पारखे यांच्या देखरेखी खाली धरणाचे पूरनियंत्रण पातळी कर्मचारी धरणाच्या पाणी पातळीकडे लक्ष ठेवून आहेत.

दारणा, गंगापूर धरणांतून विसर्ग वाढविला

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

नाशिक जिल्ह्यातील धरणांंच्या पाणलोटात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे गोदावरीत नदीला छोटा पूर आला आहे. काल सायंकाळी नदीतून 44768 क्युसेकने विसर्ग सुरू होता. रात्री 9 वाजता 54233 क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्यामुळे कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगावच्या नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपुरी भागात 240 मिमी पावसाची नोंद झाली. भावलीला 262 मिमी, तर गंगापूरच्या पाणलोटातील त्र्यंबकला 161 मिमी, अंबोलीला 189 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या भिंतीजवळ 92 मिमी, मुकणेला 88 मिमी, वाकीला 157 मिमी, भाम ला 155 मिमी, गंगापूरला 98 मिमी, नाशिकला 72 मिमी, मुकणे 88 मिमी, कश्यपीला 87 मिमी, गौतमी गोदावरीला 111 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक झाली.

कालही दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. दारणाच्या पाणलोटातील घाटमाथा धबधब्यांनी फुलून गेला आहे. त्यामुळे दारणात मागील 24 तासांत दीड टीएमसी पाण्याची आवक झाली. काल सकाळी 19972 क्युसेकने या धरणातून सुरू असलेला विसर्ग काल सकाळी 9 वाजता 2994 क्युसेकने वाढवत तो 22966 क्युसेक इतका करण्यात आला. तो काल दिवसभर स्थिर होता. गंगापूर धरण काल सकाळी 6 वाजता 80 टक्क्यांच्या पुढे गेले होते. या धरणातुनही दुपारी 12 वाजता 500 क्युसेकने विसर्ग करण्यास सुरुवात झाली. दुपारी 2 वाजता 2000 क्युसेकवर नेण्यात आला. पुन्हा दोन तासांनी 4000 क्युसेक, सायंकाळी 6 वाजता 6000 क्युसेक तर रात्री 8 वाजता तो 8000 क्युसेक इतका करण्यात आला.

दारणा समुहातील भावली 1509 क्युसेकने, कडवा 10 हजार 89 क्युसेकने, भाम 4370 क्युसेकने तर वालदेवी 183 क्युसेकने, पालखेड 5255 क्युसेकने विसर्ग सुरु आहेत. खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून दारणा समूह तसेच गंगापूर धरणातील विसर्ग दाखल होत आहे. याशिवाय पालखेडचा विसर्ग व नाशिक शहर व निफाड भागातील ओढ्या नाल्यांचे पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने काल सकाळी 6 वाजता या बंधार्‍यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 36731 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तो दुपारी 12 वाजता 44768 क्युसेक इतका करण्यात आला. या मुळे गोदावरी नदी तुडूंब भरुन वाहु लागली आहे. हे पाणी वेगाने जायकवाडी जलाशयात पोहचत आहे. काल सकाळी 6 पर्यंत 1 जून पासुन या बंधार्‍यातुन गोदावरीत 6.4 टिमएसी पाण्याचा एकूण विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडीत काल सायंकाळ पर्यंत मोठा विसर्ग पोहचलेला नव्हता. काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडी जलाशयात 15 हजार 185 क्युसेकने पाण्याची आवक सुरु होती. या जलशयात 11.20 टक्के उपयुक्तसाठा झाला आहे. म्हणजेच उपयुक्तसाठा 8.5 टिएमसी इतका तर मृतसह एकूण साठा 34.6 टिएमसी इतका झाला आहे. रात्रीतुन जास्तीतचा विसर्ग या जलाशयात सामावण्यास सुरुवात होईल.

डिंभे, वडज, येडगाव ओव्हरफ्लो

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने कुकडी समूह धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे डिंभे, वडज आणि येडगाव ही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. काल सायंकाळपर्यंत संपलेल्या बारा तासात 1540 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यामुळे या समूह धरणांतील उपयुक्त पाणीसाठा 19582 दलघफू (66 टक्के) झाला होता. आज सोमवारी हा पाणीसाठा 20 हजार दलघफू पुढे जाणार आहे.

कुकडी प्रकल्पातील सर्वाधिक क्षमता असलेले हुमात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) तुडूंब झाले आहे. काल रविवारी सकाळी 13500 दलघफू क्षमतेच्या धरणातील पाणीसाठा 11678 दलघफू (93.46 टक्के) कायम ठेऊन आवक होत असल्याने धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे घोड नदीलाही छोटा पूर आला आहे. सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 12239 दलघफू (97.15) टक्के होता. सकाळी 9 वाजता 9 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता 12 हजार क्युसेक त साडेअकरा वाजता 15 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. पाऊस वाढल्यास घोडनदीत आणखी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.

माणिकडोह धरणही निम्मे भरण्याच्या मागावर आहे. पिंपळगाव जोगे धरणातील साठा मायनस होता. पण आता या धरणातही आवक होत असल्याने काल या धरणातील पाणीसाठा 14 टक्क्यांवर गेला आहे. विसापूर 51 टक्के, चिल्हेवाडी धरणात 81 टक्के झाला आहे. पाण्याची जोरदार आवक होत असल्याने घोड धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा3534 दलघफू (73टक्के)झाले आहे. आज हे धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. कुकडी समूहातील धरणांमध्ये समाधाकारक साठा झाल्याने नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. कारण या धरणांमधील पाणीसाठ्यावर रब्बी हंगामातील पिकांचे शेतकरी नियोजन करीत असतो.

श्रीगोंदा-कर्जतच्या भिमा नदीकाठावरील गावांना इशारा

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून खडकवासला व इतर धरणांतून विसर्ग सुरू आहे. पुणे जिल्ह्यात पर्जन्यमान सुरु असून दौंड पूल येथे भिमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे.दुपारी भिमा नदीत दौंड पूल येथून 74 हजार 456 क्युसेक विसर्ग होता. त्यानंतर खडकवासला धरणातून पाणी आणखी वाढविण्यात आल्याने सायंकाळी हा विसर्ग 98675 क्युसेक वाढला होता. रात्रीतून आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भिमा नदीकाठावरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या