भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
पावसाचे आगार असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. परिणामी, नवीन पाण्याची आवक वाढल्याने धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. सोमवारी (दि.30) सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 6300 दलघफू (57.07 टक्के) तर निळवंडेचा 4043 दलघफू (48.55 टक्के) झाला असून आज हे धरण निम्मे भरणार आहे. याचबरोबर देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 966 दलघफू (91.13 टक्के) झाला आहे.
पावसाचा जोर काहीसा वाढल्याने डोंगरदर्यांवरुन धरणात येणार्या नवीन पाण्याचा वेगही वाढला आहे. गेल्या 24 तासांत (सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत) भंडारदरा धरणात 168 दलघफू तर निळवंडेत 137 दलघफू नवीन पाणी जमा झाले आहे. अधुन-मधून कोसळणार्या सरींमुळे वातावरणात गारवा टिकून राहत आहे. याचबरोबर पर्यटकांचे खास आकर्षण असलेले धबधबे कोसळू लागले असून निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी दूरवरुन निसर्गप्रेमी येत आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत (सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत) भंडारदरा 55 , घाटघर 26, पांजरे 32, रतनवाडी 39, वाकी 28, निळवंडे 13, आढळा 03 अकोले येथे 09 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जायकवाडीत उपयुक्त साठा 33.4 टीएमसी
दारणा आणि गंगापूरच्या पाणलोटात हलक्या सरी
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
धरणाच्या पाणलोटात काल पावसाचा जोर ओसरला असला तरी घोटी आणि इगतपुरी परिसरात अधून-मधून पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी कोसळत आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोटात पावसाच्या हलक्या सरी दाखल होत आहेत. जायकवाडीत उपयुक्त साठा 33.40 टीएमसी इतका झाला आहे.
जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6736 क्यूसेकने आवक होत होती. नागमठाण सरिता मापन केंद्राजवळ गोदावरीत ही आवक नोंदली गेली. काल सायंकाळच्या आकडेवारीनुसार जायकवाडीत मृतसह एकूण साठा 59.40 टक्के तर उपयुक्त साठा 33.4 टीएमसी इतका झाला आहे. धरणांच्या पाणलोटात पावसाचे प्रमाण घटले आहे, मात्र विसर्ग अजूनही सुरू आहे. दारणा धरणातून 1751 क्यूसेकने विसर्ग, गंगापूरमधून 1360 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. तर नांदुर मधमेश्वर बंधार्यातून 6815 क्यूसेकने विसर्ग गोदावरीत सुरू आहे.
काल सकाळी 6 पर्यंत 12.4 टीएमसी पाण्याचा विसर्ग नांदुर मधमेश्वर बंधार्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणातून विसर्ग सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण उपयुक्त साठा 52.86 टक्के इतका आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला हा साठा 5.38 टक्के इतका होता. या धरणांच्या लाभक्षेत्रात राहाता तसेच कोपरगाव तालुक्यात पावसाने गुंगारा मारला आहे. त्यामुळे पेरणी करून उगवलेले पिके पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.




