भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याची शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे भवितव्य अवलंबून असलेल्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा 62 टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. तर निळवंडे धरणातीलही पाणीसाठा 26 टक्क्यांवर गेला आहे.
11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सोमवारी सायंकाळी पाणीसाठा 6851 दलघफू (62.06 टक्के) झाला होता. तर काल सकाळी निळवंडेतील पाणीसाठा 2127 दलघफू (25.54 टक्के) झाला होता. तो सायंकाळी वाढून 26 टक्क्यांवर गेला.
गत दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस वाढल्याने धरणात पाणी येत आहे. काल सकाळपर्यंत संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 282 दलघफू पाणी दाखल झाले. त्यापैकी 70 टक्के पाण्याचा वापर झाला. तर 212 साठ्यात वाढ झाली. 840 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
भंडारदरा परिसरात पावसाचा जोर असल्याने कृष्णवंती नदीवरील 112 दलघफू क्षमतेचा वाकी तलावातून 1022 क्युसेकन ओव्हरफ्लो होता. पण आता पाऊस कमी झाल्याने तो 789 क्युसेकपर्यंत खाली आला आहे. काल दिवसभरात भंडारदरात 29 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
खाली कृष्णवंती नदी वाहती झाल्याने व इतर ओढेनाल्यांचे पाणी येत असल्याने निळवंडे धरणातीलही साठा वाढू लागला असून काल सकाळपर्यंत 155 दलघफू पाणी आले. हे धरण 26 टक्के भरले आहे.
गत 24 तासांत झालेला पाऊस (मिमी)-भंडारदरा 110, घाटघर 120, पांजरे 115, रतनवाडी 125, वाकी 105.