राहाता |प्रतिनिधी| Rahata
निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकर्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत, 26 जानेवारी 2026 पासून सिंचनासाठी आवर्तन सोडण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर धरणातून पाणी सुटणार असल्याने लाभक्षेत्रातील बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यासह निळवंडे लाभक्षेत्रातील अनेक गावांमधून सिंचनासाठी आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरत होती. शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने ना. विखे पाटील यांची भेट घेऊन पिकांच्या पाण्याची अडचण मांडली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालकमंत्र्यांनी तातडीने जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेऊन आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित करण्याचे आदेश दिले.
हे आवर्तन केवळ नावापुरते न राहता, कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत असणार्या प्रत्येक शेतकर्याला पाणी मिळाले पाहिजे, अशा कडक सूचना ना. विखे पाटील यांनी दिल्या आहेत. पाण्याच्या संदर्भात नियोजनात कोणतीही त्रुटी राहता कामा नये, प्रत्येक हक्काचा लाभार्थी पाण्यासाठी वंचित राहू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या धरणात असलेला पाणीसाठा आणि भविष्यातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची गरज लक्षात घेता, आवर्तनाच्या काळात पाण्याचा थेंब न थेंब जपून वापरण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. जलसंपदा विभागाने पाणी चोरी आणि अपव्यय टाळण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असेही पालकमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.




