अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक व परिसरातील हिंगणगाव, हमीदपूर, इसळक, खारेकर्जुने आदी गावांमध्ये सलग दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचे लहान मुलांवर हल्ले सुरू आहेत. या बिबट्यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून लोकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा, गोळ्या घाला, पिंजरे बसवा या मागणीसाठी शनिवारी (दि. 15) निंबळक गावात तसेच निंबळक बायपास चौकात सकाळी अकरा वाजता संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.
गेल्या दोन दिवसांपासून नगर तालुक्यातील खारेकर्जुने, निंबळक परिसरात बिबट्याची दहशत सुरू आहे. माणसांवर, पाळीव प्राण्यांवर हल्ले करून जखमी तसेच ठार मारण्याच्या घटना घडत आहेत. खारेकर्जुने येथे एका मुलीला उचलून नेऊन तिचा जीव घेतला ही घटना ताजी असतानाच निंबळक येथे मुलाला बिबट्याने जखमी केले. शनिवारी सकाळी पाळीव प्राण्यांवरही हल्ले केले गेले आहेत. कोंबड्या, शेळ्या, बकर्या फस्त केल्या. या सर्व घटनेमुळे हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
शाळा व महाविद्यालय बंद आहेत. या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शनिवारी ग्रामस्थांनी निंबळक येथील दत्त मंदिर चौक आणि निंबळक बायपास चौकात रस्तारोको आंदोलन केले. यावेळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता. यावेळी माजी जि.प. सदस्य प्रताप शेळके, उद्योजक अजय लामखडे, माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, सरपंच प्रियंका लामखडे, बी.डी. कोतकर, माजी उपसरपंच घनश्याम म्हस्के, नाना दिवटे व ग्रामस्थ उपस्थित होते. वन अधिकार्यांनी बिबट्याला पकडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.





