अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
निंबोडी (ता. अहिल्यानगर) शिवारात दुचाकीचा कट मारण्याच्या कारणातून तरूणावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यांच्या मित्राला मारहाण करून दोन दुचाकींची तोडफोड करून नुकसान केले. हल्ल्यात विकास मारूती शेंडगे (वय 25, रा. अहिल्यानगर- जामखेड रस्ता, निंबोडी, ता. अहिल्यानगर) हे जखमी झाले आहेत. त्यांनी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर शनिवारी (6 डिसेंबर) रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदरची घटना 27 नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडली आहे.
नीलेश पोटे, गोट्या मोरे (पूर्ण नावे माहिती नाही), अक्षय कचरू माळी (सर्व रा. निंबोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. निंबोडी येथील गणेश दुध डेअरीसमोर फिर्यादी तरूण आपल्या मित्रांसोबत बोलत उभे होते. यावेळी दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून संशयित आरोपींनी वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि नीलेश पोटे याने फिर्यादीच्या पाठीत चाकू खुपसून जखमी केले.
संशयित आरोपींनी दगडाने दोन दुचाकी वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. हल्ल्यात फिर्यादीचा मित्रही जखमी झाला असून, झटापटीत एका महिलेचे दागिने गहाळ झाले आहेत. दरम्यान, जखमी विकास यांच्यावर सुरूवातीला जिल्हा शासकीय रूग्णालयात व नंतर पुणे येथील ससून रूग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.




