संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील धांदरफळ येथे डॉ. सुजय विखेंच्या युवा संकल्प मेळाव्याला गेल्याचा राग मनात धरून संदीप भास्कर देशमुख यांच्या घरात घुसून तेरा जणांसह इतर आठ ते दहा अनोळखी लोकांनी त्यांच्या आईचे दागिने हिसकावून दहा हजार रुपये घेऊन गेले. तसेच गाडीचे नुकसान करून मारहाण केल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की निमोण येथील संदीप देशमुख हे धांदरफळ येथील युवा संकल्प मेळाव्याला गेल्याचा राग मनात धरून शाबीर शब्बीर तांबोळी, जुबेद उर्फ जुनेद युन्नूस तांबोळी, शेखर मोतीराम घुगे, सुयोग रमेश सांगळे, शफीक हमीद, मुस्तकीम युन्नूस तांबोळी, गोरक्ष रामदास घुगे, इस्ताक मुस्ताक पठाण, विष्णू मुर्तडक (पूर्ण नाव माहीत नाही), नहीम मुस्ताक पठाण, अनिल बबन घुगे, अनिल शिवाजी घुगे, फैजान इस्माईल अत्तार व इतर आठ ते दहा अनोळखी जमाव घरासमोर लाठ्या-काठ्या घेऊन गोळा झाला.
नंतर घरात घुसून गळ्यातील पाच तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार व अर्धा तोळ्याचे डोरले हिसकावून घेत गादीखाली असलेले दहा हजार रुपये घेऊन गेले. तसेच बोलेरो गाडीची काच फोडून संदीप व मला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे लता भास्कर देशमुख यांनी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी वरील आरोपींवर भारतीय न्यास संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे करत आहेत.