पुणे । Pune
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. तर अन्य काही प्रवासी गंभीर जखमी आहेत. जखमींना सध्या नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो वाहनाला आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की मॅक्स गाडी चेंडूसारखी फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही गाडी आपटली. यात चार महिला, चार पुरुष आणि एक लहान बाळाचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी झाले आहेत.
या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. या जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. लागलीच पोलिसांचे पथक येथे दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेची तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
दरम्यान या भीषण अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत अपघातील मृतांच्या कुटुंबियांसाठी मदतीची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचेही म्हटले आहे.