वर्धा | Wardha
राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरु आहे. त्यातच अनेक ठिकाणी विविध कारणांमुळे वाद विवाद झाल्याचे पहायला मिळत आहे. वर्ध्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याची घटना घडली. कराळे मास्तरांच्या मांडवा या गावात त्यांना मारहाण करण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केला. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाण झाल्यानंतर कराळे मास्तरांनी वर्ध्यातील सावंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
सावंगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. बूथवर कशाला आला, या कारणावरून वाद झाल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
नितेश कराळे यांनी शरद पवार गटासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रचार करत आहे. एवढेच नाहीतर लोकसभा निवडणुकीसाठीही कराळे मास्तर यांनी शरद पवार गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. पण, त्यावेळी तिकीट दिले गेले नाही. पण शरद पवार गटाच्या उमेदवारासाठी कराळे मास्तर यांनी प्रचार केला होता.
काय म्हणाले नितेश कराळे?
मी माझ्या गावावरून मतदान करून येत होतो. तेव्हा वर्धा मतदारसंघात मी निघालो होतो, यावेळी माझ्याबरोबर माझे कुटुंबही होते. उमरी या गावात जाण्यायेण्याचा रस्ता आहे. त्या ठिकाणी मी थांबलो लोकांना विचारपूस केली. यावेळी पोलिसांनी सांगितले की तुमच्या बुथवर दोन लोक ठेवा. तसेच समोर आमदार पंकज भोयर यांचा बूथ होता. या बूथवर आठ लोक बसून होते. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे काही कर्मचारी देखील बसून होते. एवढेच नाही तर ते कर्मचारी लॅपटॉप घेऊन बसून होते. त्यासाठी पोलिसांना फोन केला आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला विचारण्यासाठी पुढे गेलो असता भाजपाच्या उमरीमधील एक कार्यकर्ता माझ्या अंगावर धावून आला. तो कार्यकर्ता थेट माझ्या अंगावर धावून आला आणि मारहाण करू लागला. माझ्या पत्नीलाही शिवीगाळ केली. यामध्ये माझ्या लहान मुलीलाही लागले, असा आरोप नितेश कराळे यांनी केला. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा