मुंबई । Mumbai
गुरुवारी मुंबईत शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबावर जोरदार टीका केली. त्यांच्या या हल्ल्याला आता राज्यमंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर देत शाब्दिक युद्ध पेटवले आहे. दोन्ही नेत्यांमधील हा वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. “काही लोकांना आम्ही ‘जिहादी हृदयसम्राट’ म्हणतो. हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या मिळणारच. हिंदुत्वासाठी कोणी पुढे येत असेल, तर ते बाळासाहेबांच्या मुलाला खटकतं. त्यामुळेच त्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला,” असा घणाघात राणे यांनी केला. पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंना स्वतःच्या मुलाची अवस्था माहीत आहे. त्यामुळे मला ‘पेंग्विन’ म्हणून हिणवण्याने काही फरक पडत नाही. त्यांनी स्वतःच्या मुलाचं रात्रीचं जीवन नियंत्रित केलं असतं, तर ही परिस्थिती टाळता आली असती.”
नितेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंना स्वतःच्या वडिलांचं नाव घेण्यास लाज वाटत होती, असा टोला लगावला. “राहुल गांधी स्टेजवर असताना ‘हिंदू हृदयसम्राट’ म्हणण्याची हिंमत दाखवा. शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन इस्लामाबादमध्ये साजरा व्हायला हवा,” असं राणे म्हणाले. त्यांनी उद्धव ठाकरेंवर ‘राजकीय लव्ह जिहाद’चे उदाहरण असल्याचा आरोपही केला. “हम दो, हमारे दो एवढंच तुम्ही केलंत, आम्ही विकास करतोय,” असा टोमणा त्यांनी मारला.
शिवसेना (उबाठा) आणि मनसे युतीच्या चर्चांवरही नितेश राणे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. “ते भांडणं राज्याच्या हितासाठी नव्हती, तर कौटुंबिक वाद होते. लग्नात एकत्र येतात, तेव्हा विचारलं का? एकाकडे शून्य आमदार, दुसऱ्याकडे 20 आमदार, यातून काय साध्य होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “देशाला आज पंतप्रधानाची गरज आहे, पण ते कुठे आहेत? फक्त भाजपला पंतप्रधान आहेत. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे, घरफोड्या अमित शाहांची नाही. संरक्षणमंत्र्यांची गरज आहे, गुंडांना अभय देणाऱ्या राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांची नाही,” असे ठाकरे म्हणाले. त्यांनी महाराष्ट्रात हिंदीच्या सक्तीला विरोध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं, “हिम्मत असेल तर गुजरातमध्ये हिंदीची सक्ती करून दाखवा.”
नितेश राणे यांच्या वैयक्तिक टीकेला उद्धव ठाकरेंनी ठाकरी शैलीत प्रत्युत्तर दिलं. “एक कोण तो बाप ठरवा आधी,” असा टोला त्यांनी लगावला. “भाजपचा एक बेडूक सतत ओरडतोय. त्याला तेवढंच काम दिलंय. तुझी उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा,” अशी खोचक टीका ठाकरेंनी केली. उपस्थितांमध्ये यावर हशा पिकला. “तुझी पार्श्वभूमी काय? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? आणि तू शिवसेनेवर बोलतोस?” असा सवाल करत ठाकरेंनी राणेंना सुनावलं. “शिवसेना 59 वर्षांची झाली, पण आमचा नेता एकच, भगवा एकच, दैवत आणि विचार एकच आहे,” असं ठणकावत त्यांनी भाषण संपवलं.





