नागपूर | Nagpur
राज्यात सध्या मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय आणि सामजिक वीण उसवण्याची भीती काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. कुणाचाही रोष नको म्हणून अनेक तज्ज्ञ शांत आहेत. त्यातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही, हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो, असे गडकरी म्हणाले आहे. ते शनिवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते.
राज्यात ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, बंजारा आरक्षण, नाभिक, धोबी महादेव कोळी आणि इतर समाजही आरक्षणाविषयी मैदानात उतरले आहेत. कुणाला आरक्षणात वाटा नकोय तर कुणाला त्याच प्रवर्गात आरक्षण हवेय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र त्यांची सडेतोड भूमिका मांडली. ”मी नेहमी गंमतीने सांगतो की परमेश्वराने आमच्यावर सर्वात मोठा उपकार केला असेल तर, मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात ब्राम्हणांचे महत्त्व नाही. पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये महत्त्व खूप आहे. मी ज्यावेळेस तिकडे जातो. दुबे, त्रिपाठी, मिश्रा त्यांचे राज्य पॉवरफुल आहे. जसे इकडे मराठा जातीचे महत्त्व आहे. तसे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांचे महत्त्व आहे.”
गडकरी पुढे म्हणाले, मी त्यांना म्हणालो की, मी जातपात मानत नाही. कोणताही माणूस जात, पंथ, धर्म आणि लिंग यापैकी कोणत्याही घटकामुळे मोठा होत नाही, तर तो गुणांमुळे मोठा होतो. समाजात ज्यांची मुलंबाळं चांगली शिकली आहेत, त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




