नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अखेर नाशिक महापालिका निवडणुकीचे (Nashik NMC Election) बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि. १५) नाशिकसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार नाशिक महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान (Voting) होणार असून, दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. तब्बल साडेतीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली मनपातील प्रशासकीय राजवट आता संपुष्टात येणार असून नाशिककरांना पुन्हा लोकनियुक्त कारभारी मिळणार आहेत.
नाशिक महापालिकेतील ३१ प्रभागांमधून एकूण १२२ नगरसेवक निवडले जाणार आहेत. दोन तीन तर २९ चार सदस्यी प्रभाग रचना २०१७ प्रमाणे यंदाही राहणार आहे. अंतिम प्रभाग निहाय मतदार यादीनुसार शहरात एकूण १३ लाख ६० हजार ७२२ पाच मतदार आहेत. हे मतदारच आगामी वर्षांसाठी महापालिकेच्या सत्तेची सुत्रे कुणाच्या हाती जाणार, हे ठरवणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
नाशिक महापालिकेत १३ मार्च २०२२ रोजी प्रशासकीय राजवटीला सुरुवात झाली होती. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक न झाल्याने आयुक्तांकडे संपूर्ण कारभार सोपवण्यात आला होता, भाजपचे माजी महापौर सतीश कुलकर्णी हे प्रशासकीय राजवट (Administrative Rule) लागण्यापूर्वीचे अखेरचे महापौर ठरले. १९९२ साली मनपासाठी पहिल्यांदा मतदान झाले होते, यानंतर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासकीय राजवट लागली.
याप्रमाणे आरक्षण
एकूण जागा : १२२ (३१ प्रभाग) अनुसूचित जाती १८ जागा (यात ९ महिलांसाठी), अनुसूचित जमाती ९ जागा (यात ५ महिलांसाठी), इतर मागासवर्ग ३२ जागा (यात १६ महिलांसाठी), सर्वसाधारण प्रवर्ग ६३ जागा (यात ३१ महिलांसाठी) याप्रमाणे आहे.
ऑफलाईन अर्ज त्या विभागात भरता येणार
मनपाच्या ३१ प्रभागांसाठी १० निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करुन तीन प्रभागांसाठी एक या प्रमाणे अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑफलाईन अर्ज त्या त्या प्रभागाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे भरता येणार आहे.
तीन प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी (दि.१५) जाहीर झाला असून, मनपा आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री यांनी शहरातील ३१ प्रभागांसाठी एकूण १० निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यानुसार तीन प्रभागांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. एका अधिकाऱ्याकडे चार प्रभाग आहे. यासह तहसीलदार दर्जाचे एक व मनपाचे दोन याप्रमाणे तीन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. १६) मनपात त्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील १० डिसेंबर २०२५ रोजीच्या निर्देशांनुसार तसेच विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्या १२ डिसेंबर २०२५ रोजीच्या पत्रानुसार ही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. या आदेशानुसार नाशिक शहातील प्रत्येक तीन प्रभागांसाठी उपजिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, उपअभियंता तसेच इतर विभागीय अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार यादीची पडताळणी, उमेदवारी अर्ज प्रक्रिया, छाननी, मतदान व्यवस्थापन, मतमोजणी व निकाल जाहीर करणे या सर्व टप्प्यांमध्ये नियमांचे पालन होईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहणार आहे.आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी कोणतीही सबब न देता तात्काळ संबंधित कार्यालयात रुजु होऊन निवडणूक निर्णय अधिकारी अथवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज सुरू करावे.
मनपात येणार लोकप्रतिनिधींचे राज
निवडणूक जाहीर झाल्याने आता मनपातील राजवट संपून लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने पुन्हा एकदा महापालिका काबीज करण्यासाठी कंबर कसली असून सिंहस्थमंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्यावर निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे महायुतीतील पक्ष आणि महाविकास आघाडी व इतर काही पक्ष स्वबळावर लढणार की एकत्र, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, येत्या काही दिवसांत या संदर्भातील निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटासाठी ही महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे. शिवसेना फुटल्यानंतर पक्षातील अवघे चार-पाच माजी नगरसेवकच ठाकरे गटात राहिले आहेत. उर्वरित बहुतांश माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजप किंवा शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. सध्याच्या राजकीय स्थितीत भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी ओढ दिसून येत असून, त्याखालोखाल शिंदेसेनेलाही इच्छुकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिक महापालिका निवडणूक राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पूर्णतः पारदर्शक व शांततेत पार पाडण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेसाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी कोणत्याही निर्भयपणे आणि मोठ्या संख्येने मतदान करावे.
मनीषा खत्री, आयुक्त मनपा नाशिक
दृष्टिक्षेपात नाशिक
एकूण जागा – १२२
एकूण मतदार – १३ लाख ६० हजार ७२२
पुरुष मतदार – ७ लाख ३ हजार ९६८
महिला मतदार – ६ लाख ५६ हजार ६७५
इतर मतदार – ७९
एकूण मतदान केंद्रे – १ हजार ६००
एकूण कर्मचारी – १० हजार
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा १३ लाख रुपये





