मुंबई । Mumbai
एकीकडे सातत्याने वाढत जाणारी महागाई तर दुसरीकडे वाढलेले कर्जाचे हप्ते या दुहेरी कात्रीत सामान्य माणूस अडकला आहे. याचदरम्यान देशाच्या पतधोरणासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
यावेळीही रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट जैसे थेच ठेवला आहे. या निर्णयामुळे रेपो रेट (व्याज दर) हा ६.५ टक्क्यांवर कायम असेल. आरबीआयने सलग ११ व्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे सामान्यांची निराशा झाली आहे.
सध्याची वाढती महागाई पाहता यावेळी आरबीआय आपल्या रेपो रेटमध्ये कपात करून सामान्यांना दिलासा देईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. यावेळीही आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे घरासाठी, वाहन खरेदीसाठी कर्ज घेतलेल्यांना यावेळीह दिलासा मिळालेला नाही.
म्हणजेच यावेळीही कर्जावरील व्याज कमी होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळेच तुमच्या घराच्या कर्जाचा, वाहन खरेदी करण्यासाठी घेतलेल्या तसेच इतर कर्जाचा हप्ता यावरील व्याज कायम राहणार आहे. ते कमी किंवा जास्त होणार नाही.