Wednesday, February 4, 2026
Homeनगरस्वस्त धान्य दुकानदारांची दिवाळी कोरडी गेल्याने नाराजी; साखर, आनंदाचा शिधा व साडी...

स्वस्त धान्य दुकानदारांची दिवाळी कोरडी गेल्याने नाराजी; साखर, आनंदाचा शिधा व साडी पासून लाभार्थी वंचित

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरण होत असलेल्या विविध वस्तूंमध्ये साखर, आनंदाचा शिधा व साडी यापैकी एकही वस्तू या दिवाळीत वितरण न झाल्याने शिधापत्रिका धारकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्याचबरोबर, या वितरण व्यवस्थेचा आधार असलेले स्वस्त धान्य दुकानदारांनाही जून महिन्यापासून मार्जिन मिळाले नसल्याने दुकानदारांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. एकंदरीत, यावर्षी लाभार्थी तसेच दुकानदारांची दिवाळी कोरडी गेल्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत सर्वत्र नाराजीचा सूर दिसत आहे.

- Advertisement -

राज्यात महायुतीचे सरकार आले, त्यात सुरूवातीला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे विराजमान झाले. गरीबांची दिवाळी आनंदात जावी म्हणून या सरकारने प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अन्त्योदय या दोन योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक कुटुंबाला विस रुपये किलोने एक किलो साखर व शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला. दिवाळी सणासाठी साखर, गहू, मैदा, पोहे, तेल पिशवी व चनादाळ अशा वस्तू देऊन गरीबांच्या दिवाळीला हातभार लावत होते. त्याचबरोबर यापूर्वी दरमहा विस रुपये किलोग्रॅमने अन्त्योदय लाभार्थीना प्रत्येकी एक किलो साखर दिली जायची; ती ही गेल्या वर्षापासून बंद आहे. त्याचबरोबर अन्त्योदय लाभार्थ्यांना वर्षातून तीन साड्या देण्याचा उपक्रमही सुरू झाला होता. परंतु यावर्षीच्या दिवाळीत जिल्ह्यातील सहा लाख ४४ हजार ४०० प्राधान्य कुटूंब लाभार्थी व ८७ हजार २६ अन्त्योदय योजनेतील लाभार्थी कुटुंब आनंदाच्या शिधा पासून वंचित राहिले आहेत. त्याचबरोबर ८७हजार २६ कुटुंबांना दरमहा मिळणारी साखर बंद असल्याने या कुटुंबांत नाराजी आहे.

YouTube video player

ऐन दिवाळीत जिल्ह्यातील ८७ हजार २६ अन्त्योदय योजनेतील कुटुंबातील महिलांना सरकारची साडी उपलब्ध न झाल्याने या लाभार्थी बहिणींची अपेक्षा भंग झाली आहे. तर दुसरीकडे या वितरण व्यवस्थेचा कणा असलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांना ही गेल्या जून महिन्यापासून मार्जिन न मिळाल्याने दुकानदारही नाराज असल्याचे दिसत आहे. याबाबत मध्यंतरी दिवाळीपूर्वी राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांचे मार्जिन उपलब्ध करून दिल्याचे परीपत्रक सोशल मीडियावर फिरत होते. त्यावेळी सर्वत्र दिवाळीपूर्वी स्वस्त धान्य दुकानदारांना मार्जिन खात्यात वर्ग होईल असे खुलासे येत होते. मात्र हा सर्व प्रकार कागदावरच राहिला.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व दुकानदारांचे मार्जीन बँकेत वर्ग केल्याचा खुलासा दुकानदारांना करण्यात आला परंतू प्रत्यक्षात जिल्ह्यातील एका ही दुकानदाराला यातील रक्कम खात्यावर वर्ग झालेली नाही. याबाबत जिल्ह्यात १८८१ स्वस्त धान्य दुकाने कार्यान्वीत आहेत. जून महिन्यात युद्धजन्य परीस्थीती व पावसाळ्याचा आधार घेत जून, जुलै व ऑगष्ट या तीन महिन्याचे धान्य जून महिन्यात वितरण झालेले आहे. प्रत्यक्षात जून महिन्यात वितरण झालेल्या धान्याचे मार्जीन जुलै महिन्यातच मिळणे अपेक्षीत होते तसेच दरमहा वितरणाचे मार्जीन ही महिना संपल्यानंतर पुढील महिन्याच्या दहा तारखेपूर्वी दुकानदारांना मार्जीन मिळणार असल्याचे शासनाने सांगीतले होते. परंतु तसे घडत नाही. यात ज्यांचे एसएनएफ स्पर्श नुसार कागदपत्रांची पूर्तता व पडताळणी झालेल्या दुकानदारांचे मार्जीन आम्ही बँकेत पाठविले आहेत असा खुलासा जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून दिवाळी पूर्वीच केला गेला. दुकानदारांच्या मतानुसार आता मार्जीन करीता एसएन एफ स्पर्श ही नवीन यंत्रणा सुरू झालेली आहे, त्यानुसार या यंत्रणेमुळे तात्काळ दुकानदारांचे पैसे खात्यात वर्ग होणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.

मात्र प्रत्यक्षात दुकानदारांना ही रक्कम दिवाळी पूर्वी न मिळाल्याने शासनाकडून मार्जीन आले पण जिल्हा पुरवठा विभागाकडून दिरंगाई झाल्याने दिवाळीपुर्वी हे मार्जीन दुकानदारांना मिळाले नसल्याची कुजबूज दुकानदारामध्ये सुरू आहे. कारण संबंधित बँकांनी मार्जिन वेळेत वर्ग केले नसल्याचा खुलासा होत असताना, बँकांना सलग सुटट्यांचा आधार घेतला जात असला तरी सर्वच बँका दिरंगाई करू शकत नाहीत. यात जिल्हा पुरवठा कार्यालयाची दिरंगाई कारणीभूत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. एकंदरीत शासनाच्या दुर्लक्षामुळे यावर्षी लाभार्थीबरोबरच दुकानदारांची ही दिवाळी कोरडी गेल्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबत मोठी नाराजी पसरल्याचे दिसत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : हार्वेस्टरद्वारे ऊस कापणीमुळे उत्पादनात घट नाही

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस कापणी केल्यास प्रति एकर सुमारे 15 टन उस उत्पादनात घट होते, अशी विनाकारण चर्चा घडवून आणण्यात येत आहे....