अहमदनगर । प्रतिनिधी
गेल्या महिन्यात जिल्हा पोलीस दलातील सुमारे पावणे पाचशे पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या पार पडल्या. प्रत्येक पोलीस अंमलदारांना त्यांच्या पसंतीनुसार पोलीस ठाणे मिळाले. मात्र अनेकांनी स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) बदली मागितल्यानंतरही त्यांना देण्यात आली नाही.
दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेतील अनुभवी अंमलदारांची बदली करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात दररोजच घडत असलेल्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी एलसीबी कमी पडत आहे. एलसीबीत पोलीस अंमलदारांना नियुक्ती कधी मिळणार असा प्रश्न पोलीस दलातून विचारला जात आहे.
दरवर्षी पोलीस दलातील बदल्या केल्या जातात. यंदाही पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गेल्या महिन्यात जिल्ह्यातील सुमारे पावणे पाचशे पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या केल्या. मात्र बदली अर्जात अनेक अमंलदारांनी एलसीबीत बदली मागितली होती, मात्र त्यांना तेथे बदली देण्यात आली नाही. मागील वर्षी बदली करण्यात आलेल्या एलसीबीतील 17 अंमलदारांना त्यांच्या बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले नव्हते.
हे हि वाचा : महाराष्ट्रातील यात्रेकरूंची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली; १४ जणांचा मृत्यू!
खासदार निलेश लंके यांनी आरोप केल्यानंतर त्या अंमलदारांना कार्यमुक्त केले गेले. तसेच यंदाही 14 अंमलदार प्रशासकीय बदलीसाठी पात्र होते त्यांची देखील बदली करण्यात आली. परिणामी 50 पेक्षा जास्त संख्याबळ असलेल्या एलसीबीच्या संख्येत घट होऊन ती 10 अंमलदारांवर आली आहे, त्यात चार चालक अंमलदार आहेत. याशिवाय एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक व दोन उपनिरीक्षक असे चार अधिकारी आहेत.
जिल्ह्यात दररोजच खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, रस्तालुट, सोनसाखळी चोरी, दोन समाजाच्या वादातून होणारी हाणामारी अशा गंभीर घटना घडत आहेत. दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दौरे सुरू केले आहेत. एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस ठाण्यासह एलसीबीकडून त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला जातो व बहुतेक वेळा पोलीस ठाण्याच्या आधी एलसीबी संबंधित गुन्ह्यांची उकल करते. गेल्या वर्षभरात अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल एलसीबीने केली आहे. मात्र ही कामगिरी करणार्या बहुतांश अंमलदारांची बदली करण्यात आली आहे. परिणामी गुन्ह्यांचे ‘डिटेक्शन’ कमी झाले आहे.
हे हि वाचा : कर्ज घेता का कर्ज! जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून आवाहन
अधीक्षक ओला यांनी गेल्या दोन वर्षापासून एलसीबीत कोणत्याच अंमलदारांना नियुक्ती दिलेली नाही. नेमके तेथे नियुक्त न देण्यामागचे काय कारण हे त्यांनाच माहिती. मात्र जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडत असून त्याचा तपास पोलीस ठाण्याकडून होत नाही. त्या गुन्ह्याची उकल करण्याचा हातखंडा एलसीबीकडे आहे, मात्र एलसीबीत अंमलदारांची संख्या कमी असल्याने त्यांनी सध्या ‘थंड’ भूमिका घेतली आहे. अधीक्षक ओला यांनी एलसीबीत अनुभवी अंमलदारांची नियुक्ती केली नाही तर गंभीर गुन्ह्याची उकल करून नागरिकांना न्याय कोण देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
‘त्या’ 11 जणांनी बसविले बस्तान
एलसीबीत पाच वर्ष पूर्ण झालेल्या 14 पोलीस अंमलदारांची प्रशासकीय बदली अधीक्षक ओला यांनी केली. मात्र त्यातील तीनच अंमलदार कार्यमुक्त केले. अद्यापही 11 अंमलदार एलसीबीत कार्यरत आहे. त्यांनी तेथेच बस्तान बसविले आहे. एलसीबीत नवीन अंमलदार नियुक्त केले जात नसल्याने त्या 11 जणांना अद्याप कार्यमुक्त केलेले नाही. जर नवीन अंमलदारांची नियुक्ती करून त्यांना कार्यमुक्त करायचे नसेल तर त्यांची बदली तरी कशाला केली, अशा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात तीन हजारापेक्षा जास्त पोलिसांचे संख्याबळ असताना एलसीबीत अनुभवी अंमलदारांची नियुक्ती का केले जात नाही? असा प्रश्न पोलीस दलातून विचारला जात आहे.
हे हि वाचा : मायलेकाच्या मारहाणीत सेवानिवृत्त पोलिसाचा मृत्यू
सायबरचे 14 जण करतात एलसीबीत काम
येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर सेल स्वतंत्र पोलीस ठाणे आहे. तेथे प्रभारी पोलीस अधिकार्यांमार्फत कारभार सुरू होता. मात्र गेल्या आठवड्यात सायबर सेलला स्वतंत्र पोलीस निरीक्षक देण्यात आले आहे. मात्र याठिकाणी नियुक्ती असलेल्या 14 पोलीस अंमलदार एलसीबीत काम करत आहे. एलसीबीत थेट नियुक्ती न देता सायबर सेलमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारांकडून एलसीबीचे काम करून घेतले जात आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांना विचारले असता ते म्हणाले, ‘याबाबत मला काही सांगता येणार नाही, तुम्ही पोलीस अधीक्षक यांनाच विचारा’ असे उत्तर त्यांनी दिले.