Thursday, June 13, 2024
HomeजळगावExit Poll 2024 : उत्तर महाराष्ट्रातून कोण मारणार बाजी? काय सांगतो एक्झिट...

Exit Poll 2024 : उत्तर महाराष्ट्रातून कोण मारणार बाजी? काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज

नाशिक, नगर आणि जळगावातून कोणता उमेदवार घेणार आघाडी?

नाशिक | Nashik

- Advertisement -

काल लोकसभेचे (Loksabha) शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले. या शेवटच्या टप्प्यात सरासरी ६० टक्के इतके मतदान झाले. यावेळी शेवटच्या टप्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर विविध संस्थांकडून एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात आले. या एक्झिट पोलच्या माध्यमातून २७२ हा बहुमताचा आकडा कोण गाठू शकेल?, रालोआ विरुद्ध इंडिया आघाडी अशा महामुकाबल्यात कोण बाजी मारेल?, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता राखण्यात यशस्वी होतील की विरोधक धक्का देतील? कोणाला किती जागा मिळणार? याचे अंदाज बांधण्यात आले. त्यानंतर सर्वच संस्थाचे एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहे.

या एक्झिट पोलनुसार ३५० पेक्षा अधिक जागा जिंकून एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल, तर इंडिया आघाडीला १२५ ते १५० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलमुळे देशातील सत्तेत कोण बसणार याचा अंदाज बांधला गेला असला तरी प्रत्यक्षात निकालावेळी कोणत्या मतदारसंघातून कुठला उमेदवार विजयी होणार याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. मात्र, या एक्झिट पोलमध्ये प्रत्येक राज्यांमधील प्रमुख लढतींचे चित्र देखील दाखविण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील लढतींचे चित्र देखील दाखविण्यात आले असून यात उत्तर महाराष्ट्रातील लढतींचा सामावेश आहे.

हे देखील वाचा : Exit Polls 2024 : देशात मोदी मॅजिक कायम; इंडिया आघाडी अडखळली

उत्तर महाराष्ट्रात लोकसभेचे आठ मतदारसंघ असून त्यात नाशिक, दिंडोरी, जळगाव, नंदुरबार, रावेर, शिर्डी, अहमदनगर, आणि धुळे यांचा समावेश आहे. विविध संस्थांच्या एक्झिट पोलनुसार या आठ पैकी नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे राजभाऊ वाजे आघाडीवर आहेत. याठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत झाली. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर असून त्यांची लढत माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्याशी झाली. जळगावात भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात झाली. एक्झिट पोलनुसार या मतदारसंघात स्मिता वाघ आघाडीवर असून करण पवार पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे.

नंदुरबारमध्ये मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या हिना गावित आणि काँग्रेसचे माजी मंत्री केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांच्यात प्रमुख लढत झाली. एक्झिट पोलनुसार या मतदारसंघात गावित आघाडीवर असून पाडवी पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे. तर रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे आघाडीवर राहण्याची शक्यत असून शरद पवार गटाचे श्रीराम पाटील पिछाडीवर जाण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे. शिर्डी लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात प्रमुख लढत झाली. एक्झिट पोलनुसार या मतदारसंघातून वाकचौरे आघाडीवर राहण्याची शक्यता असून लोखंडे पिछाडीवर जाऊ शकतात.

हे देखील वाचा : Nashik and Dindori Constituency : मतमाेजणीसाठी पाचशे पाेलिस ऑनड्युटी

तसेच अहमदनगर दक्षिणमधून भाजपचे डॉ. सुजय विखे पिछाडीवर जाण्याची शक्यता असून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके आघाडी घेऊ शकतात, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. तर धुळे लोकसभेतून भाजपचे सुभाष भामरे आघाडीवर राहण्याची शक्यता असून कॉंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव पिछाडीवर राहणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलचे हे अंदाज खरोखर किती अचूक ठरतात हे येत्या ४ जून रोजी निकालाच्या वेळीच स्पष्ट होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या