श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातून जाणार्या नॉर्दन ब्रँच कालव्यात सोडण्यात येणारे दूषित पाणी बंद करण्यासाठी गेल्या 25 ते 30 वर्षांपासून प्रयत्नांची आवश्यकता होती. मात्र, या गंभीर प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याचे आव्हान नॉर्दन ब्रँच सिंचन शाखेचे शाखा अभियंता असद शेख यांनी स्वीकारले. कालवा नूतनीकरण, स्वच्छता व खोलीकरण मोहिमेंतर्गत आपल्या कार्यकाळात टप्प्याटप्प्याने कालव्यात सोडण्यात येणार्या दूषित सांडपाण्याचे स्रोत बंद करून त्यांनी कालवा स्वच्छ व चकाचक केला. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे शहरवासीयांसह वरिष्ठ अधिकार्यांनीही कौतुक केले आहे.
शहरातील रेल्वे लाईनच्या उत्तरेकडील बाजूने नागरी वस्तीतून हा नॉर्दन ब्रँच कालवा शिरसगाव व हरेगावच्या दिशेने जातो. अनेक वर्षांपासून कालव्यालगतच्या रहिवाशांकडून टॉयलेट व बाथरूमचे पाणी कालव्यात सोडले जात होते. कालव्याचे रोटेशन बंद झाल्यानंतर या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत असे. स्थानिक रहिवासी तसेच पादचार्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. याशिवाय कालव्यातून तसेच कालव्याच्या बाजूने शहरातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन गेल्याने दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता असल्याच्या तक्रारी नागरिकांनी नगरपालिका व पाटबंधारे विभागाकडे केल्या होत्या.
जलसिंचन विभागाच्या कालवा स्वच्छता व खोलीकरण मोहिमेंतर्गत कार्यकारी अभियंता एस. व्ही. काळे व उपविभागीय अभियंता संजय कल्हापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्दन ब्रँचचे शाखा अभियंता असद शेख यांनी या कामाची जबाबदारी स्वीकारली. कामाला एकाच वेळी सुरुवात न करता त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्याटप्प्याने काम हाती घेतले. यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नगरसेवक यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. शहरवासीयांना पिण्याचे पाणी पुरविणार्या नळ पाईपलाईन योग्य पद्धतीने बाजूला काढून देण्यात आल्या. त्यामुळे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता दूर होऊन या भागातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठ्याचा दिलासा मिळाला.
अनेक वर्षांपासून ऐरणीवर असलेल्या कालवा स्वच्छतेच्या प्रश्नाकडे शेख यांनी जातीने लक्ष देत स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांचे सहकार्य घेतले. कालवा स्वच्छता व खोलीकरण मोहिमेंतर्गत त्यांनी उत्कृष्ट काम पूर्ण केले. त्यामुळे कालव्यात साचणार्या दूषित पाण्यामुळे निर्माण होणार्या दुर्गंधीपासून नागरिकांची सुटका झाली आहे. नागरिकांच्या सहकार्याने कालव्यात सोडण्यात येणारे टॉयलेट व बाथरूमचे सांडपाणी कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याने नॉर्दन ब्रँच कालवा आता स्वच्छ व मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत असून, वरिष्ठ अधिकार्यांनीही शाखा अभियंता असद शेख यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.




