Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधबालक दिन नव्हे, पालक जागृती दिन !

बालक दिन नव्हे, पालक जागृती दिन !

आपली मुले आदर्श नागरिक बनावित असे वाटत असेल तर पालकांनी जागृत राहायला हवे. आज अनेक बालकांची चित्त अशांत आहेत, मोबाईल, मीडियाचे वाढते व्यसनही त्याला मुख्यतः कारणीभूत आहेत. म्हणूनच मूल सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे. त्या अर्थाने बालक दिन हा सुजाण पालकत्वाची गरज जाणवून देणारा पालक दिनच म्हणावा लागेल…

अरे, किती वेळ झाला मोबाईलवरचे गेम खेळत बसला आहेस.. आता बंद कर बघू.. नाही तर फेकून देईन हं मी तो मोबाईल… अवंती चिडून पाच वर्षांच्या सागरला रागावून म्हणत होती. तिच्या या बोलण्यावर सागर ही, ही करत जास्तच हसत सुटला. जणू काही आई कितीही रागावली तरी मोबाईल फेकून देणार नाही, असे त्याला वाटत होते. त्यामुळे अवंती जास्तच चिडली आणि त्याच्या पाठीत एक धपाटा घालण्यासाठी धावून गेली. ते बघून सागरची आजी त्रासून म्हणाली, आमच्या वेळी असली काही यंत्रे नव्हती. त्यासरशी अवंती जागेवरच थांबून म्हणाली, अगदी खरे बोललात तुम्ही. तुमच्या वेळी हे असले काही नव्हते म्हणूनच मुलांना वाढवणे सोपे होते. धाक होता मुलांना. हल्ली घरोघरी हे किस्से घडत असतात.

तिच्या म्हणण्यात तथ्य होते. पूर्वी मुलांना वाढवणे खरेच खूप सोपे होते. कौटुंबिक वातावरण समाजामध्ये होते. प्रत्येक घरात किमान तीन-चार भावंडे असायची. मोठ्या मुलाला थोडं-फार धाकात ठेवले की काम भागत असे. मुले मुळात अनुकरणप्रिय असल्यामुळे धाकटे भावंड मोठ्या भावंडाची शिस्त व संस्कार याचे पालन करत असे. संस्कारांची बीजे मोठ्यापासून धाकट्यापर्यंत आपोआप रुजली जायची. मुलात मूल आनंदाने वाढायचे. आपल्याला मिळालेली वस्तू किंवा खाऊ सगळ्या भावंडांमध्ये मिळून वाटून घ्यायची तडजोडीची वृत्ती ही आपोआपच अंगात भिनायची. त्यासाठी आई-वडिलांना वेगळा वेळ द्यावा लागत नव्हता. मुख्य म्हणजे मोबाईलसारख्या चैनीच्या वस्तू उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे मुलांना त्यांची सवय लागण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मनोरंजनासाठी मुले मैदानावर आपोआपच खेळायला जायची, गोष्टींची पुस्तके वाचायची. त्यामुळे बौद्धिक आणि शारीरिक व्यायाम याबद्दल आई-वडील निश्चिंत असायचे. आईच्या मायेच्या नजरेखाली आणि आजी-आजोबांच्या उबदार कुशीत, सुरक्षित वातावरणात मुलांचे मानसिक आरोग्य उत्तम जपले जात होते.

- Advertisement -

पण आज काळ खूप बदलला. एकूण सामाजिक, आर्थिक परिस्थिती खूप बदलली आहे. त्यामुळे कुटुंबाची घडीही वेगळी झाली, महागाई वाढली तसेच मुलांची संख्याही कमी झाली. आता तर ‘आमच्या या दोन हातात, एकच एक राहील सुखात!’ हे सुखी संसाराची सूत्र मानले जाऊ लागले आहे. घरातल्या स्त्रियांना अर्थार्जनासाठी बाहेर पडावेच लागते. यामुळे कुटुंबाचे राहणीमान उंचावले. सगळ्याच मनोरंजनाच्या आणि सुखचैनीच्या वस्तू मुलांना सहज मिळू लागल्या. पण आई नोकरीला गेल्यावर भावंडाअभावी मूल एकटे पडते आणि मग मोबाईल हाच त्यांना जिवाभावाचा मित्र वाटू लागतो. पुढे मुले त्याच्या आहारी जातात. अशा वेळी मुलांना या वस्तू उपलब्ध करून देतानाच त्याच्या आहारी न जाण्याची समजूत मुलांमध्ये आणणे हे पालकांसाठी तारेवरच्या कसरतीसारखे अवघड काम होऊन बसले आहे. ही समज मुलांमध्ये येण्यासाठी मोबाईलच्या आभासी जगातला खोटेपणा पटवून देऊन त्याच वेळी बाहेरच्या खर्‍या जगातला आनंद घेण्याची गोडी लावणे, हाच मुलांना वाचवण्याचा रामबाण उपाय आहे. या बाहेरच्या जगातल्या आनंदामध्ये मैदाने, वेगवेगळे खेळ, त्यातली मजा अनुभवायला देत बुद्धिबळासारखे अधिक चालना देणारे खेळ खेळणे, एखाद्या कलेची आवड जोपासून त्यातील नवनिर्मितीचा आनंद घ्यायला शिकवणे या गोष्टी करता येतील.

कलेमध्ये गायन, वादन, नृत्य, वाद्यवादन; इतकेच काय पण हस्तकलेचे विषयसुद्धा मुलांना आवडू शकतात. एकदा या नवनिर्मितीच्या आनंदाची गोडी कळली की ते मोबाईलसारख्या खोट्या, आभासी जगापासून आपोआपच दूर राहतील. अर्थात त्यासाठी पालकांना करावे लागणारे कष्ट आणि द्यावा लागणारा वेळ याला कोणताही पर्याय नाही. यासाठी पालकांनाही आपल्या आवडीनिवडी बदलाव्या लागतात. अन्यथा, पालक स्वतः तासचे तास टीव्ही किंवा मोबाईल बघत बसले आणि त्यांनी मुलांना ते बघू नकोस म्हणून उपदेश केला तर मुलांनाकधीच पटत नाही. आजचे जग हे स्पर्धेचे आहे. त्यात आपल्या मुलाने टिकावे, मोठेपणी खंबीरपणे उभे रहावे, असे पालकांना वाटणे सहाजिक असते आणि त्यासाठी शिक्षण हा राजमार्ग आहे हे ही सर्वज्ञात आहे. पण काही वेळा असे दिसते की पालक मुलांवर आपल्या मनातल्या अपेक्षांचे ओझे लादतात. बालक देखील आई-वडिलांच्या प्रेमापोटी त्यांच्या इच्छेच्या इतक्या आहारी जाते की आपल्याला काय पाहिजे हेच विसरून जाते. त्यांना हवे ते बनवून दाखवण्यासाठी ते लढायला सज्ज होते. दुर्दैवाने तेवढी बौद्धिक क्षमता नसेल तर त्याला अपयश येते, त्याचा आत्मविश्वास जातो आणि प्रसंगी ती नैराश्याचे बळीही ठरू शकतात.

एकंदरीत, अपत्याची बौद्धिक क्षमता समजून घेण्याला तसेच त्यांना प्रेमाने स्वीकारण्याला खरे पालकत्व म्हणता येईल. थोर शिक्षणतज्ञ रुसो म्हणतात की मुलांना मूल म्हणून जगू द्यावे. नेहरू चाचा नेहमी म्हणायचे, मुले म्हणजे देवाघरची फुले आहेत. त्यांना उमलतील तसे उमलू द्यावे.

पालकांनी स्वतःला काय पाहिजे, यापेक्षा पाल्याला काय पाहिजे, काय व्हायचे आहे हे विचारले पाहिजे. त्यांना अत्यंत सुरक्षितपणे, प्रेमभावनेने वाढवायला हवे. यातला सुरक्षितपणा म्हणजेच मुलांना आत्मविश्वास देणे हा भाव अभिप्रेत आहे.

आपली मुले उद्याचे सुसंस्कृत सुविद्य, आदर्श नागरिक घडावेत, असे प्रत्येक मातापित्याला वाटत असते. पण त्यासाठी पालकांनी मुलांच्या बालपणापासूनच जागृत रहायला हवे. आज बालजगतात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे ही गोष्ट चिंतेची तर आहेच, पण त्यामुळे हेच दिसते की या बालकांची चित्त अशांत आहेत. असुरक्षिततेच्या भावनेने त्यांना ग्रासले आहे. याचा अर्थच असा की त्यांच्यावर संस्कार करायला आपण कमी पडत आहोत. मुले मनातली भावना कधीच बोलून दाखवत नाहीत, पण मनातल्या धुमसत्या रागाचा आणि नैराश्याचा ज्वालामुखी बाहेर पडून मोठेपणी गुन्हेगारी रूपांतर होते. म्हणूनच मूल सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे, काळजीपूर्वक लक्ष घालण्याचे काम आहे.

आपले मूल मोठेपणी सदाचरणी, समाजाभिमुख, आदर्श नागरिक व्हावे, असे वाटत असेल तर त्याचे बाळकडू लहानपणापासूनच द्यायला हवे. कारण मुलांवरील संस्कारांची सुरुवात ही पहिल्यांदा घरातूनच होते. घरातच परस्परांना मान देण्याचे, प्रेम करण्याचे, अतिथीचा सन्मान करण्याचे संस्कार होत असतील तर ते मूल आपोआपच संवेदनशील आणि विनम्र वृत्तीचे घडत जाते. दुर्दैवाने काही मुले ही जन्मतः दिव्यांग असतात. अशा मुलांना सांभाळताना पालकांची आयुष्याची कसोटी लागते. पण अनेक समाजसेवी आणि सरकारी संस्था अशा मुलांना सांभाळण्यासाठी पुढाकार घेतात आणि पालकांना मदतीचा हात देतात. त्या अर्थाने पाहता बालक दिन हा सुजाण पालकत्वाची गरज जाणवून देणारा पालक दिनच म्हणावा लागेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या