मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत एक परिचारिका (नर्स) नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित देखरेख करणे शक्य होणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी शनिवारी येथे दिली. दरम्यान, सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये १६ जून रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या दिवशी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे
राज्यात एकूण ४९७ शासकीय आश्रमशाळा आणि ५५४ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने सहा वर्षांवरील वयोगटातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे. आरोग्यविषयक तक्रारी उद्भवल्यास विद्यार्थ्यांना तत्काळ प्राथमिक उपचार देण्यासाठी शाळेत परिचारिकेची उपलब्धता अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे परिचारिका नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिचारिकांमार्फत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला, प्रथमोपचार करण्यात येणार असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यासही मदत होईल, असे उईके यांनी सांगितले.
दरम्यान, नाशिक आणि ठाणे विभागातील शाळा १६ जून तर नागपूर, अमरावती विभागातील शाळा ३० जून २०२५ पासून सुरु होतील. त्यामुळे नाशिक जवळच्या मुंडेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत १६ जून रोजी शाळा प्रवेशोत्सवासाठी आपण स्वतः उपस्थित राहणार आहोत. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह आरोग्य, सुविधा आणि प्रशासन यामधील सुसंवाद वाढवण्यासाठी ‘वसतीगृह समन्वय समिती’ स्थापन करण्यात आली आहे. ही समिती वसतीगृह स्तरावर कार्यरत राहून विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करेल, असेही उईके यांनी सांगितले.
‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरती
विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आता ‘पवित्र पोर्टल’ या ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अनुदानित आश्रमशाळांमध्ये होणारी शिक्षक भरती पारदर्शक, निकोप आणि गुणवत्ताधारित होणार असून ‘पवित्र पोर्टल’द्वारे निवडले जाणारे सर्व शिक्षक ‘शिक्षक अभियोग्यता चाचणी’ उत्तीर्ण असणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच वाढ होणार असून शिक्षक भरती प्रक्रियेवरील विश्वासार्हता वाढून, विद्यार्थ्यांना अधिक प्रशिक्षित आणि पात्र शिक्षक लाभणार आहेत, असेही उईके म्हणाले.
इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘राघोजी भांगरे गुणगौरव पुरस्कार योजना’ राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, नामांकित शाळा, सैनिकी शाळा तसेच एकलव्य आदर्श निवासी शाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा गौरव केला जाईल, अशी माहितीही अशोक उईके यांनी दिली.




