मुंबई | Mumbai
राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष होताना दिसत आहे. एकीकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणात मराठ्यांचा समावेश होऊ नये, यासाठी लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक ओबीसी नेते आक्रमक पवित्रा घेत आहेत. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह शरद पवारांवर तीव्र टीका केली ज्यानंतर त्यांना वारंवार धमक्या मिळत आहे. याशिवाय ओबीसी नेत्यांकडूनच लक्ष्मण हाकेंना डावलले जात असल्याची चर्चा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांची नुकतीच केलेली फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून, ते आंदोलन पुढे नेणार की मागे घेणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
मराठा आरक्षणाबाबत जीआर काढल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मेळावा आणि दौऱ्यांमधून ओबीसींना एकत्र करण्याचे काम करत आहेत. याचपार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील दैत्यानांदूर येथे शनिवारी (२७ सप्टेंबर) ओबीसी मेळावा होणार आहे. त्याआधीच लक्ष्मण हाकेंनी लिहीलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
लक्ष्मण हाकेंनी पोस्टमध्ये काय म्हंटले आहे?
लक्ष्मण हाके यांनी फेसबुक पोस्ट करताना म्हटले की, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून मी प्रामाणिकपणे भांडतोय. आपले हक्क आणि अधिकार टिकले पाहिजेत. मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे. मी बॅनर छापू शकत नाही, गाडीला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिली. उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असो किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात आणि मला पाठिंबा देत राहिलात. त्याबद्दल मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, असे त्यांनी म्हटले.

लक्ष्मण हाके म्हणाले की, मी ओबीसीच्या बाजूने बोलत गेलो आणि भांडत गेलो. ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहांना जोडत गेलो. लाखो माणसं जोडली, पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली. हल्ले झाले, ते मी झेलले, पण आता सहन होत नाही. शनिवारी (२७ सप्टेंबर) दैत्यानांदूर ता. पाथर्डी, जि,. अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन. मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, पण तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर आभार मानतो, अशी भावनिक पोस्ट लक्ष्मण हाके यांनी लिहिली आहे. त्यामुळे आता ते उद्या काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




