Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्या... तोपर्यंत निवडणुका नको, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत एकमत

… तोपर्यंत निवडणुका नको, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत एकमत

मुंबई | Mumbai

ओबीसींच्या (obc reservation)राजकीय आरक्षणाबाबत आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray)आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. महत्वाची बाब म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाला इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे आदेश देण्यावर, तसंच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको, या मुद्द्यांवर एकमत झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -

या बैठकीनंतर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसींचे राजकीय आरक्षण जोपर्यंत लागू करत नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत. याबाबत बैठकीमध्ये सकारात्मक भूमिका मांडली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून इम्पिरिकल डेटा मिळवून ओबीसींच्या जागा वाचवता येतील. ओबीसींच्या साडेचार हजार जागा वाचू शकतील अशी माहिती मुख्य सचिवांनी दिली. आता तात्काळ इम्पिरिकल डेटा जमा करण्याबाबतचे आदेश राज्य मागासवर्ग आयोगाला द्यावेत. तीन ते चार महिन्यात हा इम्पेरिकल डेटाचे काम पूर्ण करावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका नकोत अशी आमची भूमिका आहे. ज्या जिल्ह्यांवर जास्त परिणाम होतोय त्यासाठी वेगळा विचार करावा. बैठकीत जी काही चर्चा झाली ती सकारात्मक होती. जवळपास सर्वांचे एकमत होते पण यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

तसेच, आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालयाने राजकीय आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा ठरवून दिली आहे. आता ती मर्यादा ओलांडण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात किंवा जे काही करायचं असेल, त्याला वेळ लागेल आणि तेवढा वेळ जर थांबलो तर ओबीसींसाठी एकही जागा शिल्लक राहत नाही. म्हणून, या दोन्ही लढाया सोबत लढल्या गेल्या पाहिजेत. आता ५० टक्क्यांच्या आतलं, किमान तेवढ्या जागा म्हणजे साधारणपणे ८५ टक्के जागा आपण समजू एकूण जागांपैकी या सुरक्षित होत आहेत. त्या ८५ टक्के जागा ओबीसींना परत करायच्या किंवा ओबीसींना लढण्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या आणि १५ टक्के जागांसाठी पुन्हा लढाई करायची. अशाप्रकारे जर केलं तर ओबीसींवर अन्याय होणार नाही. अन्यथा निवडणुका होऊन जातील आणि एकही जागा ओबीसींसाठी शिल्लक राहणार नाही. असे फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या