शिरवाडे वाकद | प्रतिनिधी Shirvade Vakad
वीज बिल देण्यासाठी आलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भास्कर त्र्यंबक भोकनळ रा.तळेगाव रोही ता.चांदवड यांस निफाडचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ए.टी. काळे यांनी दोषी ठरवत दोन लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे तंत्रज्ञ जितेंद्र चव्हाण, दादाजी पठाडे, योगेश झाल्टे असे भास्कर त्र्यंबक भोकनळ यांच्यावर झालेल्या वीजचोरीच्या कारवाईची दंडात्मक १९३४० रुपयांचे वीज बिल देण्यासाठी तळेगांव रोही येथे दि.२४ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.१५ वा गेले असता भोकनळ यांनी वीज बिल फेकुन दिले व वीज वितरण कंपनीचे तंत्रज्ञ जितेंद्र चव्हाण यांचेवर मारण्यास धावत धक्काबुक्की केली, शर्ट फाडला तसेच दादाजी पठाडे यांनाही मारहाण केली होती वरून गावात नोकरी कशी करता अशी धमकी दिली.
हे देखील वाचा – संपादकीय : २६ नोव्हेंबर २०२४ – जीवनगाणे गातच राहावे
या घटनेचे तंत्रज्ञ योगेश झाल्टे यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. या प्रकरणी तंत्रज्ञ जितेंद्र चव्हाण यांनी चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार भास्कर त्र्यंबक भोकनळ यांचेवर भा.द.वि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करुन निफाडच्या जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील रामनाथ शिंदे यांनी फिर्यादी साक्षीदार तसेच तपास अधिकारी पोलिस उपनिरिक्षक विशाल सणस यांचेसह एकुण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली व प्रभावी युक्तीवाद केला. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यावरुन आरोपी भास्कर त्र्यंबक भोकनळ यास भा.द.वि कलम ३५३, ३३२, ५०४ व ५०६ प्रमाणे दोषी ठरविण्यात आले.
प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स अॅॅक्ट कलम ४ प्रमाणे एक वर्षाकरीता शांतता व चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र देण्यात यावे, जिल्हा प्रोबेशन अधिकाऱ्यांच्या निगराणीत रहावे व अटी शर्थींचे पालन करावे, फिर्यादी व साक्षीदार यांना भरपाई दाखल न्यायालयात दोन लाख रुपये चौदा दिवसांचे आत जमा करावे व त्या रक्कमेतील एक लाख रुपये फिर्यादी जितेंद्र चव्हाण व प्रत्येकी पन्नास हजार रुपये साक्षीदार योगेश झाल्टे व दादाजी पठाडे यांना देण्याचा आदेश न्यायालयाने केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा