अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रिसोड (जि. वाशिम) येथील वृध्दाचे अपहरण करून त्यांच्यासह एकावर दरोडा टाकणार्या सराईत गुन्हेगारांचा अहिल्यानगरमध्ये थरारक पाठलाग करून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने दोघा संशयितांना जेरबंद करत अपहृत वृध्दाची सुखरूप सुटका केली. ही कारवाई रविवारी (14 डिसेंबर) रात्री करण्यात आली.
या प्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असून, संशयित आरोपींनी लग्नाचा खोटा बनाव रचत फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. सदर बनाव उघडकीस आल्यानंतर संशयित आरोपींनी फिर्यादीचे वडील सिताराम नारायण खानजोडे (वय 60, रा. आसेगाव, ता. पेन, जि. वाशिम) यांचे अपहरण केले. अपहरणानंतर आरोपींनी फिर्यादी अंकुश मोहन राठोड (रा. बोरगडी तांडा, ता. हिमायतनगर, जि. नांदेड) हे मित्रासह दवाखान्याकडे जात असताना त्यांची कार अडवली व 22 हजार रूपये रोख रक्कम लुटण्यात आली. सदरचे संशयित अहिल्यानगरच्या दिशेने आल्याची माहिती वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले.
पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेंडी बायपास परिसरात नाकाबंदी करत असताना छत्रपती संभाजीनगरकडून अहिल्यानगरकडे भरधाव वेगाने येणारी संशयित कार दिसून आली. पोलिसांनी कार अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेग वाढवत एमआयडीसीच्या दिशेने पलायन केले. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक माणिक चौधरी यांच्या पथकाला सतर्क करून संयुक्त पाठलाग सुरू करण्यात आला.
कॉलेज कॉर्नर परिसरात कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन डिव्हायडरवर आदळून बंद पडले. पोलिसांनी तात्काळ कारमधील तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत राहुल दिलीप म्हस्के (वय 32) व सतीश ऊर्फ बाळू विनायक जाधव (वय 29, दोघेही रा. जालना) हे आरोपी असल्याचे स्पष्ट झाले, तर तिसरे व्यक्ती म्हणजे अपहृत सिताराम खानजोडे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना पुढील तपासासाठी रिसोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.




