Friday, November 15, 2024
Homeराजकीयसचिन पायलट यांचे भाजपात स्वागत : ओमप्रकाश माथुर

सचिन पायलट यांचे भाजपात स्वागत : ओमप्रकाश माथुर

नवी दिल्ली – राजस्थानातील राजकीय घडामोडींवर आतापर्यंत सावध प्रतिक्रिया देणार्‍या भाजपाने प्रथमच सचिन पायलट यांना भाजपात येण्याचे जाहीर निमंत्रण देत आपले पत्ते उघड केले आहेत. काँग्रेस नेते सचिन पायलट आणि त्यांच्या सहकार्‍यांचे भाजपात स्वागत असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश माथुर यांनी म्हटले आहे. आपल्याजवळ बहुमत असल्याचा दावा मुख्यमंत्री अशोक गहलोत करत आहेत, मात्र त्यांच्याजवळ बहुमत असेल तर त्यांनी ते विधानसभेत सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

आमची विचारधारा मान्य असेल, त्या सर्वांसाठी मग ते सचिन पायलट असो की, अन्य कोणी, आमचे दरवाजे खुले आहे. समाजाच्या वेगवेगळ्या वर्गातील लोक आमच्या विचारधारेवर विश्वास ठेवत आमच्या पक्षात प्रवेश करतात, त्यामुळेच आज आमचा पक्ष विशाल झाला आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

सचिन पायलट यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, याकडे लक्ष वेधले असता माथूर म्हणाले, मुख्यमंत्र्यांची निवड विधिमंडळ पक्ष करत असतो. सचिन पायलट आणि मुख्यमंत्री गहलोत यांच्यातील मतभेद ही त्या पक्षातील अंतर्गत बाब होती. मात्र, या वादात काँग्रेसने पायलट यांच्यासोबत जे केले, ते योग्य म्हणता येणार नाही, असेही ते म्हणाले. राजस्थानमधील जनतेने काँग्रेसला सरकार चालवण्याची संधी दिली होती, त्याचा त्यांनी योग्य उपयोग करायला हवा होता. गहलोत यांनी सरकारवर आपली पकड बसवायला हवी होती, पण तसे ते करू शकले नाही. काँग्रेसच्या अनेक आमदारांची गहलोत यांच्यावर नाराजी होती, असे माथुर यांनी स्पष्ट केले. दरम्यान गहलोत सरकारमधून हकालपट्टी होईपर्यंत आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचे सचिन पायलट सांगत होते, त्यामुळे भाजपाच्या निमंत्रणानंतर आता ते कोणती भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या