Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधविशेष पोषणावर बोलू काही...

विशेष पोषणावर बोलू काही…

दिवाळी आपल्याला तिमिराकडून प्रकाशाकडे नेते. मनातल्या अज्ञानाचा अंधःकार ज्ञानाच्या प्रकाशाने उजळणे ही खरी दिवाळी. यंदाच्या दिवाळीला तर करोनाची पार्श्वभूमी आहे. ‘आरोग्य’ गृहीत धरून बेभानपणे वागणार्‍या समाजाला करोनाने ‘जोर का झटका’ दिला आहे. त्यामुळे या दिवाळीत मौजमजेबरोबर चिंतनही करणे गरजेचे आहे.

धनत्रयोदशीला भगवान श्री धन्वंतरी जयंती असते. याच दिवशी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ साजरा केला जातो. यंदाचे हे सहावे वर्षे आहे आणि या वर्षीची संकल्पना आहे- ‘आयुर्वेद फॉर पोषण’. आयुर्वेदातली ‘पोषण’ ही संकल्पना समजून घेणे आणि आचरणात आणणे हा उद्देश प्रत्येकाच्या मनात असावा, अशी अपेक्षा आहे. शरीराचे पोषण उत्तम असेल तर आजार होणार नाहीत आणि झालेच तर लवकर बरे होतील, हा आधीच माहीत असलेला धडा करोनाने आपल्याला क्रूर पद्धतीने शिकवला. त्यामुळे योग्य पोषण ही काळाची गरज आहे.

‘पोषण आणि आयुर्वेद’ ही संकल्पना समजून घेताना ‘शरीर पोषण’ म्हणजे देह, इंद्रिय, मन आणि आत्मा यांचे पोषण हे स्पष्ट आहे. त्यामुळे फक्त देह पोषणाचा विचार हा आयुर्वेदानुसार मर्यादित विचार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा, परंपरांचा आणि आहाराचा पुरातन काळापासूनचा इतिहास बघितला तर त्यांचा पाया आयुर्वेदावर आधारित आहे हे लक्षात येते. आजवर आपल्या देह, इंद्रिय, मन, आत्म्याचे पोषण हे संस्कृती, परंपरा, कुटुंब व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, सणवार, प्रचलित आहार द्रव्ये आणि भोजन व्यवस्था यामुळे झाले आहे.

- Advertisement -

आजही आपल्या दैनंदिन जगण्याची प्रक्रिया बरीचशी आयुर्वेद शास्त्रानुसार आहे. ती जाणीवपूर्वक नसली तरी अंगवळणी पडल्यामुळे आहे. पण आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, चंगळवाद, हॉटेल संस्कृतीमुळे आयुर्वेद आधारित जीवनशैली मागे पडू लागली आहे. त्याचे परिणामही आपण भोगत आहोत. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, वंध्यत्व, संधिवात, पीसीओएस.. इत्यादी आजार घरोघरी मुक्कामाला आले आहेत. त्यामुळे आयुर्वेदातली पोषण संकल्पना समजून घेणे अगत्याचे आहे.

खरे तर हा विषय व्यापक आहे. आहारासंबंधी शास्त्रामध्ये विस्तृत विवेचन केले आहे. आपल्याला यात दोन प्रकारचे मार्गदर्शन मिळते. आहार द्रव्यांचे गुणधर्म आणि आहार कशा पद्धतीने घ्यावा, याचे नियम. आहारसेवनाचे नियम आपण काटेकोरपणे पाळले तरी उत्तम पोषणाचा मार्ग सुकर होत असतो. त्यामुळे प्रथम नियमांचा विचार करू. ‘यत् पिंडी तत् ब्रम्हांडी’ हा पहिला नियम. निसर्गाचे घड्याळ कायम अचूक चालत असते. त्यानुसार शरीरातले जैविक घड्याळही फिरत असते.

या दोन्ही घड्याळांची लय सारखी ठेवली की शरीरातली संप्रेरके आपोआप योग्य वेळी पाझरू लागतात. उत्सर्जन- विसर्जन क्रिया योग्य वेळी होतात. सूर्योदयाच्या वेळी उठणे आणि सूर्यास्तानंतर लगेच भोजन करून लवकर झोपणे ही खरी आदर्श जीवनपद्धत. ती पाळणे शक्य असलेल्यांनी अवश्य पालन करावे. हल्ली असे वागणार्‍यांची ‘बुरसटलेले’ म्हणून खिल्ली उडवली जाते. मात्र हेच अक्षय कुमारने सांगितले की पटते.

दुसरा अत्यंत साधा पण तेवढाच कठीण नियम म्हणजे भूक लागली असतानाच खाणे. पशु, पक्षी आणि लहान बाळे हा नियम पाळतात, पण आपले काय? केव्हाही आणि काहीही खाण्यात आपल्याला काहीच गैर वाटत नाही. पथ्य (हितकर) आणि अपथ्य (अहितकर) एकत्र करून खाणे म्हणजे ‘समशन’. भोजन झाल्यावरही खाणे म्हणजे ‘अध्यशन’. भोजनाची वेळ नसतानाही भोजन करणे म्हणजे ‘विषमाशन’.

विरुद्ध गुणधर्म असणारे पदार्थ एकत्र करून खाणे म्हणजे ‘विरुद्धाशन’. समशन, अध्यशन, विषमाशन आणि विरुद्धाशन ही अनेक व्याधींना आमंत्रण देणारी कारणे आहेत. आपण या चुका कळत नकळत करतो. ही कारणे आपण विचारपूर्वक टाळली तर बर्‍याच आजारांना अटकाव होऊ शकतो.

तिसरा अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे पोट भरून, तडस लागेपर्यंत जेवू नये. जेवणानंतर सुस्ती, जडपणा, दम लागणे ही लक्षणे निर्माण होत असतील तर आपले जेवण प्रमाणापेक्षा जास्त झाले आहे हे समजावे. प्रत्येकाला आपल्या पोटाचा अंदाज असतो. आपल्या पोटाचे आपण चार भाग करावेत. दोन भाग घन आहार, एक भाग द्रव पदार्थ आणि एक भाग वायूच्या संचारासाठी मोकळा ठेवावा असे शास्त्र सांगते. ‘सावकाश जेवा’ असे म्हणण्याची आपली परंपरा आहे. ‘सावकाश’ म्हणजे स अधिक अवकाश.

अवकाश म्हणजे पोकळी. सावकाश याचा अर्थ पोकळीसह. म्हणजे पाहुणचार करतानाही आयुर्वेदाचा नियम पाळण्याची परंपरा आहे. आपण मात्र ‘सावकाश’चा अर्थ आपल्या सोयीने घेतला आहे. चौथा अगदी साधा नियम म्हणजे तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावे. शरीराला गरज असेल त्यावेळी शरीर पाणी मागते. हल्ली तासातासाला पाणी पिण्याचे प्रमाण फार वाढले आहे. त्यामुळे हे अतिरिक्त पाणी शरीराबाहेर काढताना ताण वाढून अवयव कमकुवत होऊ लागतात. हे चार नियम सामान्य आहेत.

ते सगळ्यांनीच आचरणात आणणे आवश्यक आहे. पाचवा नियम हा व्यक्तीसापेक्ष आहे. म्हणजे आजच्या भाषेत तो ‘पर्सनल डाएट प्लॅन’ आहे. याला आहारविधी विशेषायतन म्हणतात. हे आठ प्रकारचे आहेत. ‘प्रकृती’ म्हणजे आहार द्रव्यांचे गुणधर्म. ‘करण’ म्हणजे द्रव्यावर होणार्‍या प्रक्रिया. ‘संयोग’ म्हणजे पदार्थात योग्य द्रव्यांचे मिश्रण. ‘राशी’ म्हणजे भोजनातल्या प्रत्येक पदार्थाची मात्रा. ‘देश’ म्हणजे आहारद्रव्यांचे उत्पत्ती स्थान. ‘काल’ म्हणजे भोजनाचा योग्य काळ. ‘उपयोग संस्था’ म्हणजे भोजनाचा अपेक्षित परिणाम बघणे. तर उपयुक्तता म्हणजे भोजन घेणार्‍या व्यक्तीची प्रकृती.

अत्यंत सूक्ष्म विचार करून हे अष्ट आहारविधी विशेषायतन ठरवलेले आहेत. आहाराबद्दलचा पूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो. अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीचे आहार नियोजन केल्यास व्याधीप्रतिकारक क्षमतेचा स्तर निश्चितच उंचावेल. आहारसेवनाचे महत्त्वाचे नियम बघितल्यावर ‘काय खायचे?’ हा विषय ओघानेच येतो, जो शास्त्रात अत्यंत विस्तृतपणे मांडला आहे. आहारद्रव्यांचे बारा प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. ‘शुकधान्य’, ‘शिंबी धान्य’, ‘मांसवर्ग’, ‘शाकवर्ग’, ‘हरितवर्ग’, ‘मद्यवर्ग’, ‘अंबुवर्ग’, ‘फलवर्ग’, ‘दुग्धवर्ग’, ‘ईक्षुवर्ग’, ‘कृतान्नवर्ग’ आणि ‘आहारयोग्य वर्ग’ अशा स्वरूपात, प्रत्येक वर्गात असणार्‍या समस्त द्रव्यांचे गुणधर्म शास्त्रात लिहून ठेवले आहेत.

या प्रत्येक वर्गावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. उदाहरणादाखल सांगायचे तर शुकधान्य म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी, राळ, निवार, वरई, शामाक इत्यादी. यापैकी बाजरीनंतरची शूकधान्ये अनेक व्याधींमध्ये परिणामकारक ठरतात. व्याधीनाशनासाठी त्यांचे अनेक उपयोग लिहून ठेवले आहेत. या अनेक धान्यांची नावे आपल्याला माहीत नाहीत. वापरणे तर दूरच. पण संशोधनाअंती स्पष्ट झालेय की ही धान्ये ‘मिलेट्स’ या वर्गातली असून त्यात भरपूर चोथा आहे.

ती वर्षानुवर्षें साठवता येतात आणि गहू, तांदळाप्रमाणेच त्यात पोषणमूल्ये आहेत, पण ती वजन वाढवत नाहीत आणि पचायलाही हलकी आहेत. ही धान्ये मधुमेह, लठ्ठपणा यावर वापरावीत, असे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वीच लिहून ठेवलेय आणि आजचे संशोधनही तेच सांगत आहे. विस्मृतीत गेलेल्या या शूकधान्यांची लागवड, उत्पादन करून ती बाजारात लोकप्रिय करणे हा विचार करणे आज गरजेचे आहे. आज जग जवळ आल्यामुळे आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ खाणे प्रतिष्ठेचे मानले जाते.

वास्तविक, हे पदार्थ ‘संयोगविरुद्ध’ आणि ‘देशविरुद्ध’ असतात. आयुर्वेदातल्या आहारद्रव्यांच्या संपत्तीला आणि पूर्वी वापरल्या जाणार्‍या वेगवेगळ्या लाह्या, सातू , हळीव, राजगिरा, मुरमुरे, फुटाणे, शिंगाडे इत्यादी स्वस्त पण उच्च पोषणमूल्ये असणार्‍या पदार्थांना आपण अडगळीत टाकले आहे. त्याऐवजी ओट्स, केलॉग्ज, ऑलिव्ह ऑईल अशी बरीचशी पाहुणीमंडळी स्वयंपाकघरात विराजमान झाली आहेत.

देहाच्या पोषणाबद्दल लिहू तितके कमीच आहे. मनाच्या पोषणासाठी योगसाधना अत्यंत परिणामकारक आहे. आयुर्वेदात देहाच्या रसायनाबरोबर सुदृढ मनासाठी ‘आचार रसायन’ (कोड ऑफ कंडक्ट) ही सांगितले आहे. ‘सत्वावजय चिकित्सा’ हा मनाच्या पोषणाचा एक उपचार असून त्यामध्ये रुग्णाला त्याच्या व्याधिनुसार काय योग्य आणि काय अयोग्य आहे, हे सांगितले जाते. इंद्रियांच्या पोषणाचा आज विचार केला तर सध्या त्यांचे ‘अतिपोषण’ होतेय असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

बाह्य जग आणि शरीर या मधला दुवा म्हणजे ज्ञानेंद्रिये असतात. आपण ज्या काही चुका करतो, त्या सर्वप्रथम ज्ञानेंद्रियांना झेलाव्या लागतात. आज दहा महिन्यांच्या बाळालाही जेवू घालताना व्हिडिओ दाखवण्याची महाभयंकर चूक आम्ही सर्रास करत आहोत. इंद्रियांचे योग्य पोषण केले पाहिजे, हा विचारही आज पचणारा नाही इतके आम्ही भरकटलो आहोत.

मन आणि इंद्रिय यांचे योग्य पोषण करण्यास आम्ही असमर्थ असू तर आत्म्याच्या पोषणा बद्दल काय बोलावे? आत्मपोषणासाठी सगळ्या बाह्य प्रवृत्ती आत खेचून घ्याव्या लागतात. निदान रोज दहा मिनिटे शांत बसून आपल्या आत डोकावून बघावे आणि आपलाच आतला आवाज ऐकावा.

कुणी सांगावे, एखाद्या दिवशी आपल्या या आवाजाची ओढ आपल्याला लागेल आणि आत्म्याच्या पोषणाची ही सुरुवात होईल. धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने, आयुर्वेद दिनाच्या मुहूर्तावर आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण आयुर्वेद आणि पोषणाचा डोळसपणे विचार करूया आणि ते आचरणात आणू या.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या