मुंबई | Mumbai
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ (Pardhade Railway Station) बुधवारी (दि.२२ जानेवारी) रोजी पुष्पक एक्स्प्रेसमधुन आग लागल्याची अफवा पसरल्याच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडले. त्यामध्ये १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
त्यानंतर आता भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry of Railways) रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आतापर्यंत सात मृतांचा शवविच्छेदन करण्यात आले आहे. या सर्व मृतदेहांवर रासायनिक प्रक्रिया करून मृतदेह (Dead Body) पोलिसांच्या स्वाधीन केले जातील आणि त्यानंतरच नातेवाईकांना सुपूर्द करण्यात येणार आहे.या मृतदेहांना पाच ते सहा दिवस त्यांच्या गावी जाण्यासाठी लागू शकतात त्यामुळे सर्व मृतदेहांवर रासायनिक प्रक्रिया करूनच मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात येतील असे डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले आहे.
फडणवीसांकडून मृतांना पाच लाखांची मदत जाहीर
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यात फडणवीस म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जवळील एका दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, अशी घोषणा त्यांनी केली.