नाशिक | प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात आता फोन आहे आणि निशाणा आहे आमदार, खासदार व मंत्री ! कांद्याच्या घसरलेल्या भावांमुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवार (दि.१२) पासून ‘फोन करो आंदोलन’ सुरू केले असून, राज्यभरातून हजारो शेतकरी नेत्यांना फोन करून जाब विचारत आहेत. या आंदोलनाने पहिल्याच दिवशी नेत्यांच्या फोनच्या घंटींनी धडाका लावला असून, काहींनी तर कॉल उचलणे बंद केल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले, कांद्याच्या भावात सतत घसरण होतेय. उत्पादन खर्चही वसूल होत नाही. केंद्र व राज्य सरकारच्या अनियमित धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. हे आंदोलन १२ सप्टेंबरपासून सात दिवस चालणार असून, प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या भागातील नेत्यांना फोन करून किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ३,००० रुपये प्रति क्विंटल, सबसिडी व निर्यात धोरणात बदल याबाबत जाब विचारावा.फोन कॉल रेकॉर्ड करून व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये शेअर करा. नेत्यांना ‘मेटाकुटीला आणा’ हाच उद्देश आहे.
शेतकरी योगेश वाणी (पुणतांबा) यांनी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना फोन करून दर घसरणीचा जाब विचारला. ‘भाव वाढवण्यासाठी काय करणार? शेतकरी मरायला निघाले आहेत,’ असा प्रश्न विचारून त्यांनी रेकॉर्डिंग शेअर केली. तसेच, गणेश भडके (साकेगाव, पाथर्डी तालुका ) यांनी अनेक नेत्यांना कॉल केले. भडके म्हणाले, “आज पहिल्याच दिवशी नेत्यांनी कॉल उचलणे बंद केले. पण आम्ही थांबणार नाही.”
संघटनेच्या सभासदांनी सांगितले की, या आंदोलनाने नेत्यांना जागे करायचे आहे. केंद्र सरकारच्या निर्यात शुल्क वाढीमुळे कांदा निर्यात अडली, बफर स्टॉकमधील कांदा बाजारात सोडला गेला, यामुळे भाव कोसळले. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १,५०० रुपये अनुदान द्या व २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करा,” अशा मागण्या शेतकरी फोनवरून मांडत आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हा. हजारो कॉल्सनी नेत्यांना दाबा. हे आंदोलन यशस्वी झाल्यास आणखी पावले उचलण्याचा इशारा दिघोळे यांनी दिला आहे




