नाशिक | प्रतिनिधी Nashik
राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) कडून २०२२-२३ या वर्षात खरेदी करण्यात आलेल्या उन्हाळ कांद्याचे १० टक्के पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १५० शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी रुपये थकीत आहेत. या प्रलंबित रकमेच्या विरोधात रयत क्रांती संघटनेने गुरुवारी (दि.१६) एनसीसीएफच्या नाशिक येथील कार्यालयात जोरदार आंदोलन करत अधिकार्यांना कार्यालयातच कोंडून ठेवले.
या आंदोलनाचे नेतृत्व रयत क्रांतीचे माजी प्रदेशाध्यक्ष व कृषी मूल्य आयोगाचे सदस्य दीपक पगार व संतोष पगार यांनी केले. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी ते कार्यालयात पोहोचले असता, शाखा व्यवस्थापक बी. बी. सिंग अनुपस्थित होते. त्यांना अनेक वेळा फोन करूनही ते उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी काही कर्मचारी आतमध्ये अडकले होते.
घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कार्यालयाचा दरवाजा उघडवून मध्यस्थी केली. चर्चेनंतर शाखा व्यवस्थापक सिंग यांनी सोमवार (दि.२०) पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत रक्कम वर्ग करण्याचे आश्वासन दिले.
शाब्दिक चकमक
यावेळी पोलिस निरीक्षक पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना सुनावले की, “शेतकऱ्यांची मागणी योग्य असली तरी अधिकारी कोंडणे ही पद्धत चुकीची आहे.” यावर दीपक पगार यांनी उत्तर दिले, “जर आम्ही हे टोकाचे पाऊल उचलले नसते, तर अधिकारी भेटलेच नसते.” यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमकही झाली.
शेतकऱ्यांचे पैसे सोमवारपर्यंत मिळाले नाहीत, तर रयत क्रांती संघटना पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.




