राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील एका कांदा व्यापार्याला खंडणी मागून लुटण्याच्या प्रयत्नातील चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा खटल्याच्या सुनावणी दरम्यान राहुरी येथील न्यायालयात दोषारोप सिद्ध झाले आहे. न्यायाधीश मयूरसिंह गौतम यांनी चारही आरोपींना खंडणीच्या गुन्ह्यात तीन वर्षे व कट रचून लुटण्याचा प्रयत्न प्रकरणी तीन वर्षे अशी सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील कांदा व्यापारी अक्षयकुमार सुरेशचंद मुथ्था यांना 26 एप्रिल 2024 रोजी अनोळखी मोबाईलवरून खंडणीसाठी फोन आला होता. ‘तुझ्या मुलीस सुखरूप पहायचे असेल, तर पाच लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी मुथ्था यांना धमकी देण्यात आली होती. त्यावेळी मुथ्था यांनी दुर्लक्ष केले, नंतर चार दिवसांनी पहाटे मुथ्था फिरण्यासाठी घरातून बाहेर गेले. तेव्हा चेहर्यावर बुरखा बांधलेल्या चार जणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या डोळ्यात स्प्रे मारला. त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेण्याचा प्रयत्न केला. खंडणी दिली नाही तर परिवाराला संपवून टाकण्याची धमकी दिली. नंतर वेळोवेळी खंडणीसाठी फोन करून आम्हीच तुझ्यावर हल्ला केला. आता 10 लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. याप्रकरणी मुथ्था यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दि. 27 एप्रिल 2024 रोजी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे व रवींद्र पिंगळे आदी पथकाने 28 एप्रिल 2024 रोजी आरोपींना गजाआड केले. सदर गुन्ह्याचा खटला अंडर ट्रायल चालवून सरकारी वकील अॅड. रवींद्र गागरे, अॅड. सविता ठाणगे-गांधले, निराज पर्बत यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून महेश शेळके, प्रशांत पवार यांनी काम पाहिले. तपासा दरम्यान आरोपींनी फिर्यादी मुथ्था यांच्या चेहर्यावर मारण्यासाठी वापरलेला स्प्रे ज्या दुकानातून घेतला, त्या दुकानदाराचा जबाब घेतला. ज्या मोबाईलवरून फोन करून खंडणी मागितली, तो मोबाईल हस्तगत केला. इतर तांत्रिक पुरावे प्राप्त केले. 25 जून 2024 रोजी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. न्यायालयाने नऊ महिन्यांत 13 साक्षीदार तपासले. पो.उप. नि. रवींद्र पिंगळे व चारुदत्त खोंडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
न्यायाधिश मयूरसिंह गौतम यांनी आरोपी नागेश चिमाजी देवकर, वय 29 वर्षे, रा. वांबोरी, शशिकांत युवराज सुखदेव, वय 26 वर्षे, रा. बेलापूर, हल्ली रा. सुभाषनगर, वांबोरी, बबलू रामदास कुसमुडे, वय 31 वर्षे, संदीप रामदास कुसमुडे, वय 36 वर्षे, दोघेही रा. वांबोरी या चार आरोपींना खंडणीच्या गुन्ह्यात तीन वर्षे व कट रचून लुटण्याचा प्रयत्न प्रकरणी तीन वर्षे अशी सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.