अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील अंबिका बस स्टॉप समोरील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरी नावाच्या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी शनिवारी (27 डिसेंबर) दुपारी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी जुगाराचे साहित्य, दोन दुचाकी आणि रोख रकमेसह एकूण एक लाख 5 हजार 910 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
केडगाव परिसरातील एका शेडमध्ये लोकांकडून पैसे घेऊन हार-जितीचा ऑनलाईन जुगार खेळवला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार शिरीष तरटे, रोहिणी दरंदले आदींनी पंचांसह सापळा रचून सदर ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयितांना पथकाने शिताफीने पकडले.
या कारवाईत ऑनलाईन लॉटरी खेळवणारा दशरथ संतोष होगले (रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) आणि जुगार खेळणारे भाऊसाहेब पोपट कोतकर (वय 42) व अंकित विलास बनकर (वय 23) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळावरून 40 हजार रूपये किमतीची मोपेड, 30 हजार रूपयांची दुचाकी, दोन संगणक स्क्रीन आणि पाच हजार 910 रूपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.




