Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंध... तरच स्त्रिया सक्षम होतील

… तरच स्त्रिया सक्षम होतील

डॉ. रोहिणी (पंत) सिंह, गोवा

आपल्या समाजात अगदी प्राचीन काळापासून मुलींना जपण्याच्या नावाखाली तिच्यावर नियंत्रण ठेवले जात असे, आजही ठेवले जाते. आधुनिक काळातही फार कमी प्रमाणात स्त्रिया स्वतंत्रपणे जगतात. कित्येक स्त्रिया आर्थिक रूपाने स्वतंत्र असूनही त्यांचे स्वतंत्र अस्तित्व समाज मान्य करत नाही. आपल्या भारतीय संविधानात स्त्री आणि पुरुषांचे समान अधिकार आहेत. महिलांना समानतेचा, स्वतंत्रतेचा, शोषणाच्या विरोधात संरक्षणाचा, विवाह, हुंडा, घटस्फोटासारख्या विषयांसंदर्भात कायद्याचे संपूर्ण संरक्षण प्राप्त करण्याचा अधिकार आहे. वडिलांच्या संपत्तीतही मुलींचा मुलांएवढाच अधिकार आहे. पण तिला तो अधिकार मिळतो का?

- Advertisement -

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।

यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:॥

अर्थात, मनुस्मृतीनुसार जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे देवता निवास करतात आणि जिथे स्त्रियांची पूजा होत नाही, त्यांचा सन्मान होत नाही तिथे केलेले सर्व कर्म निष्फळ होतात. हे सर्वांनाच माहीत आहे तरीही स्त्रियांना मान का दिला जात नाही? देवी बनवून पूजा करावी अशी अपेक्षा कोणतीही स्त्री करत नाही पण सन्मानाची तर अपेक्षा ठेवतेच, करायलाच पाहिजे कारण तो तिचा अधिकार आहे. आज अनेक महिला आर्थिक रूपाने स्वतंत्र आहेत. तरीही घरात आणि बाहेर पुरुषप्रधानतेच्या नियमामाणेच महिलांना राहावे लागते. दुय्यमत्व सहन करावे लागते. महिलांनी कितीही प्रगती केली तरी त्यांच्या सामाजिक स्थानात विशेष परिवर्तन दिसून येत नाही. याचे मुख्य कारण आहे आमची सामाजिक व्यवस्था आणि पारंपरिक विचारधारा!

काही अपवाद सोडले तर घराचा भार पूर्णपणे महिलेच्या खांद्यावरच असतो. मुलांना जन्म देणे, त्यांना योग्य संस्कार देऊन मोठे करणे, नवर्‍याची प्रत्येक गरज पूर्ण करणे, आहे तेवढ्या पैशात घर चालवणे अशी अनेक कर्तव्ये ती पार पाडत असते.लग्नात मुलींचे कन्यादान सर्रास होत असते. यात मानवतेच्या द़ृष्टीने तिचे काय स्थान आहे? येथे स्त्री-पुरुष समानता कशी होऊ शकेल? हुंडा या विषयावर बोलू तेवढे कमीच. लग्नासाठी सर्वांना उच्चशिक्षित आणि नोकरी करणार्‍या मुलीच पाहिजेत पण तिने घरचे सगळे सांभाळून केले पाहिजे. सगळ्या अपेक्षा मुलींकडूनच… असे का?

लहानपणापासूनच मुलींवर अनेक प्रकारची बंधने घातली जातात पण मुलांचे काय? ते दिवसभर काय करतात, कुठे जातात, कोणाबरोबर असतात, मोबाईलवर काय पाहतात, घरी उशिरा येतात, काही विचारले तर व्यवस्थित उत्तर देत नाहीत, काहींच्या बाबतीत दारू, सिगारेट वगैरे आलेच! त्यापुढे जाऊन सोशल मीडियाचा कसा उपयोग करतात, मुलींबद्दल काय विचार करतात अशा अनेक गोष्टी आहेत, या विषयावर त्यांच्याबरोबर कधीच संवाद साधला जात नाही.

आता काळाची गरज आहे समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची. मुलावर वेगळे संस्कार करण्याची. मुलींना मानवतेच्या दृष्टीने वागवले पाहिजे. मुलींना सर्वांनीच साथ दिली पाहिजे, तेव्हाच स्वस्थ समाज निर्माण होऊ शकेल. याव्यतिरिक्त स्त्रियांनी स्वत: अन्यायाविरुद्ध लढण्यास सक्षम असले पाहिजे. स्वत:चे निर्णय स्वत:च घेतले पाहिजेत. जे दुसर्‍यावर अवलंबून राहतात त्यांना कधीच स्वातंत्र्य मिळत नाही. केवळ कठपुतली बनून जगणे आणि स्वत:वर कसा अन्याय झाला यावर रडणे, याला काही अर्थ नाही.

डॉ. रोहिणी (पंत) सिंह, गोवा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या