दिल्ली । Delhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मंगळवारी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके)मधील दहशतवादी तळांवर निर्णायक कारवाई केली. लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त मोहिमेत एकूण ९ ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले, ज्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.
- Advertisement -
भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. मध्यरात्री 1:28 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन 1:51 वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.
मिनिट टू मिनिट काय घडलं?
- 1:28 AM: इंडियन आर्मीच्या अधिकृत हँडल ADGPI ने ट्विट केले: प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः। (प्रहारासाठी तत्पर, विजयासाठी प्रशिक्षित.) हे ऑपरेशनच्या सुरुवातीचे संकेत होते.
- 1:28 AM ते 1:51 AM दरम्यान: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्फोट झाले. विशेषतः मुजफ्फराबादसारख्या भागातील स्थानिक लोकांनी ग्रीड स्टेशन्सवर क्षेपणास्त्र हल्ल्यांविषयी सांगितले. यामुळे संपूर्ण पाकिस्तानात गोंधळाचे वातावरण होते.
- 1:51 AM: सैन्याने दुसरे ट्विट केले: #PahalgamTerrorAttack Justice is Served. Jai Hind
या 9 ठिकाणी भारताचा एअर स्ट्राइक
- बहावलपूर – आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेले हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते, जे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले आहे.
- मुरीदके – हे दहशतवाद्यांचे अड्डे आंतरराष्ट्रीय सीमेपासून 30 किमी अंतरावर आहे. ते लष्कर-ए-तैयबाचे तळ होते जे 26/11 च्या मुंबई हल्ल्याशी जोडलेले होते.
- गुलपूर- हे दहशतवाद्यांचे अड्डे नियंत्रण रेषेपासून (पूंछ-राजौरी) 35 किमी अंतरावर आहे.
- लष्कर कॅम्प सवाई – हे दहशतवाद्यांचे अड्डे पीओके तंगधार सेक्टरच्या आत 30 किमी अंतरावर आहे.
- बिलाल कॅम्प – जैश-ए-मोहम्मदचा लाँचपॅड, या लपण्याच्या जागेचा वापर दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी केला जात असे.
- कोटली – नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर असलेला लष्कर कॅम्प. हे 50 हून अधिक दहशतवादी राहू शकतील अशी क्षमता असलेले लपण्याचे ठिकाण होते.
- बर्नाला कॅम्प- हे दहशतवाद्यांचे अड्डे नियंत्रण रेषेपासून 10 किमी अंतरावर होते.
- सरजल कॅम्प – सांबा-कठुआच्या समोरील आंतरराष्ट्रीय सीमेपासून 8 किमी अंतरावर असलेले जैशचे प्रशिक्षण केंद्र होतं.
- मेहमूना कॅम्प (सियालकोट जवळ) – हा हिजबुल मुजाहिदीनचा प्रशिक्षण कॅम्प होता आणि आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी अंतरावर होता.